नागठाणे, (प्रतिनिधी)- एसटी प्रवासाच्या तिकीट भाड्यात महिला प्रवाशांना पन्नास टक्के सवलत देऊन ‘महिला सन्मान योजना’ राबवणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जाहिरात विषयक धोरणाने महिला वर्गाला शरमेने मान खाली घालावी लागत अआहे.
बसवर ‘निरोधा’च्या मागणीसंदर्भातील अश्लील उत्पादनांच्या जाहिराती चिकटवून महिला प्रवाशांचा खरेच सन्मान राखला जातोय का, असा प्रश्न महिला वर्गातून विचारला जाऊ लागला आहे.
राज्य शासनाने एसटी प्रवाशांसाठी घोषित केलेल्या सवलतींच्या योजना लोकप्रिय झाल्या. पर्यायाने एसटी प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. उत्पन्न वाढले. प्रवाशांच्या माध्यमातुन कडून मिळणाऱ्या उत्पन्नांव्यतिरिक्त कँटीन,
मालवाहतूक, पार्सलसेवा, स्टॉल्स अशा अनेक मार्गाने एसटी आर्थिक उत्पन्न मिळवते. तसेच बसगाड्यांच्या आत व बाहेर विविध कंपन्यांच्या उत्पादनांच्या जाहिरातींद्वारेही उत्पन्न मिळवले जाते.
त्यात शासकीय जाहिरातींचाही समावेश असतो. अर्थात हे सर्व एसटीच्या व्यवस्थापकीय मंडळाकडून वरिष्ठ पातळीवर ठरत असले तरी एखाद्या जाहिरातीसंदर्भात महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा विचार करणे गरजेचे असते.
लैंगिक विषयांवर आजही उघडपणे बोललं जात नाही. टीव्ही पाहतानाही अशा जाहिरातीवेळी चॅनल बदलण्याचा पर्याय तरी असतो. अशा उत्पादनांची जाहिरात एसटीवर करणं योग्य आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.
सध्या एका खासगी कंपनीच्या ‘निरोध’ची जाहिरात बसगाड्यांच्या तिन्ही बाजुला चिकटवलेली दिसते. त्यातील मजकुर पाहता, नुसता ‘निरोध’ नको, हाच ‘निरोध’ मागा अशा आशयाची ही जाहिरात आहे.
या जाहिरातीमुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना शरमेने मान खाली घालावी लागत आहे. ‘एडस्’ सारख्या असाध्य रोगाने थैमान घातले.
त्यावर प्रतिबंध करताना आरोग्य यंत्रणेने योग्यरित्या प्रचार केला. हे करताना सामाजिक संस्कृतीला कुठेही धक्का लागू दिला नाही. पण आता या गोष्टीच्या जाहिरातीची गरज नसताना निव्वळ उत्पन्न मिळावे म्हणून अशा उत्पादनांची जाहिरात एसटी बसवर करणे संतापजनक आहे. आक्षेपार्ह जाहिराती हटवण्याची मागणी महिला करत आहेत.
जाहिराती न हटवल्यास आंदोलन
एसटी बसेसवरील या उत्पादनाची जाहिरात महिला, युवती, शालेय मुलींमध्ये लज्जा उत्पन्न करणारी आहे. बसमध्ये प्रवासादरम्यान काही युवकांकडून या जाहिरातीवरून टोमणे मारण्याचे प्रकार होत आहेत.
याचा सारासार विचार करून एसटी प्रशासनाने अशा जाहिराती तात्काळ हटवाव्यात अन्यथा एसटी विरोधात आंदोलन करू, असा इशारा महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांन दिला.
शंभर बसवर जाहिरात…
संबधित आक्षेपार्ह एक जाहिरात कंपनी करत आहे. एसटी बसच्या तिन्ही बाजूला जाहिरात करण्याची मंजुरी आहे. दहा जिल्ह्यातील आगारांच्या विभागीय नियंत्रकांना याबाबत कळविण्यात आले आहे. दहा आगारांमधील प्रत्येकी दहा मिळून शंभर बसगाड्यांवर ही जाहिरात करायची आहे.
ही जाहिरात १७ मेपासून पुढील तीन महिने बसवर दिसणार व १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनीच या जाहिरातींपासून एसटी बसला स्वातंत्र्य मिळेल .