लातूर : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा नीट (NEET) पेपर घोटाळ्याची पाळेमुळे देशभर पसरल्याचे हळू हळू समोर येताना दिसत आहे. या प्रकरणाची विविध राज्यांमध्ये चौकशी सुरू आहे. महाराष्ट्रातील लातूरमध्येही चार आरोपी असून, त्यांचे दिल्लीजवळ राहणाऱ्या गंगाधरशी असलेले कनेक्शन समोर आले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार गंगाधरसोबत पैशांची देवाणघेवाण झाली होती.मात्र आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
नीट परीक्षा देणाऱ्या लातूरच्या 9 विद्यार्थ्यांकडे पाटणाचे प्रवेशपत्र असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या परीक्षार्थींनी पाटण्याला जाऊन परीक्षा दिली आहे का? महाराष्ट्रातील एनईईटीच्या विद्यार्थ्याला बिहारचे प्रवेशपत्र आणि केंद्र का मिळाले याचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणातील फरार आरोपी गंगाधर हा पाटण्यात सतत कोणाच्या तरी संपर्कात होता. गंगाधर हा लातूर येथील जिल्हा परिषदेचा शिक्षक आणि आरोपींच्या संपर्कात असल्याचं उघड झालं आहे.
गंगाधरकडून आरोप फेटाळण्यात आले
संशयित आरोपीने सर्व आरोप फेटाळले आहेत. “माझा छळ केला जात असून माझा NEET प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. मी हरियाणात राहत असून नोकरी करतो. मी गुडगावमधील एका कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करतो, असा दावा त्याने केला आहे. मला NEET म्हणजे काय हे माहित नाही. मी दिल्लीतून पळून गेलेलो नाही, मी मुलांना भेटायला आलो आहे. जर NEETचा कोणी विद्यार्थी माझे नाव घेत असेल तर त्याला माझ्याकडे घेऊन या. लातूरचे आरोपी माझे नाव का घेत आहेत ते मला माहित नाही’, अशी प्रतिक्रिया गंगाधरकडून देण्यात आली.