पिंपरी, (प्रतिनिधी) – मुलींच्या मोफत शिक्षणासाठी केलेल्या घोषणेचा पडला विसर म्हणून शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पोस्टाने बदाम पाठविले. या बदामामुळे पाटील यांची स्मरणशक्ती वाढावी, या हेतून हा उपसाहात्मक पद्धतीने हा उपक्रम राबविण्यात आला. चिंचवडमधील पोस्टातून बदामाचे पाकीट पाटील यांना भेट म्हणून पाठविण्यात आले.
शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 9 फेब्रुवारी रोजीजी घोषणा केली होती की ज्या पालकांचे उत्पन्न वार्षिक आठ लाखापेक्षा कमी आहे, त्या मुलींना बारावीनंतरचे उच्च शिक्षण मोफत देणार. महाराष्ट्रातील तमाम गरजू भगिनींच्या उच्च शिक्षणाच्या आशा पल्लवीत झाल्या.
उच्च शिक्षणातील अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, अशा विविध प्रकारच्या सध्याच्या 642 आणि नव्याने सुरु होणार्या 200 अभ्यासक्रमांसाठी म्हणजेच जवळपास 850 अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याचेही आपण स्पष्ट केले होते.
परंतु अशा कोणत्याच प्रकारच्या योजनेची अंमलबजावणी झाली दिसत नाही. त्यामुळे शिक्षणमंत्री जे घोषणा करतात त्या घोषणेचा त्यांना विसर पडला की काय? यासाठी त्यांची स्मरणशक्ती वाढावी म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने त्यांना निवेदन आणि त्यात बदाम पाठवण्यात आला आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर, प्रदेश सचिव व माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, चिंचवड विधानसभा अध्यक्षा स्वप्नाली आसोले, भोसरी विधानसभा अध्यक्षा सारिका हरगुडे, पिंपरी विधानसभा उपाध्यक्षा कल्पना घाडगे,
शहर उपाध्यक्ष रेखा मोरे, शहर समन्वयक जयमाला कदम, शहर सरचिटणीस ताहिरा सय्यद, विमल विटकर, पिंपरी विधानसभा उपाध्यक्षा कमल दाहिंजे, सारिका कंडारे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.