नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये सिडको परिसरामध्ये असलेल्या एका खाजगी शाळेत अकरा वर्षाच्या चिमुकलीचा चक्कर येऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शाळेत तास सुरु असताना या मुलीला अचानक चक्कर आली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिव्या त्रिपाठी असे मृत पावलेल्या तरुणीचे नाव असून ती 6 वीच्या वर्गात शिकत होती.
काय घडले नेमके?
शाळेत वर्गात बसल्यानंतर दिव्याला भुरळ आली आणि त्यानंतर ती खाली पडली. यानंतर तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होईल.
मात्र ब्रेंनस्ट्रोक किंवा हार्ट-अटॅक मुळे या मुलीचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे दिव्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तसेच तरुण मुलीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.