Nagesh Bapurao Patil Ashtikar । 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आजही लोकसभेत शपथविधीचा कार्यक्रम सुरू आहे. अशात आज हिंगोली लोकसभाचे उद्धव ठाकरे गटाचे यांच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या शपथेवर आक्षेप घेण्यात आला आहे.
संसदेत नागेश पाटील आष्टीकर यांनी मराठीत शपथ घेतली. यादरम्यान त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण केलं. त्यामुळे हंगामी लोकसभा अध्यक्षांनी आक्षेप घेत, दुरुस्ती सुचवली. अध्यक्षांनी शपथ घेताना जे लिहिलं आहे, त्यानुसारच शपथ घेणं आवश्यक असल्याचं त्यांना सांगितलं. त्यामुळे आष्टीकरांना पुन्हा एकदा शपथ घ्यावी लागली.
सुरवातीला नागेश पाटील आष्टीकर यांनी शपथेवेळी म्हटले,’मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने, दत्त महाराज, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे,व माझे वडील बापूराव पाटील आष्टीकर यांना स्मरुन शपथ घेतो की, मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती श्रद्धा व निष्ठा बाळगीन. आणि भारतीय एकात्मतेचे स्मरण करेन, जे कर्तव्य मला प्राप्त होते, ते नेकीने पार पाडेन. यावेळी त्यांना अध्यक्षांनी थांबवलं आणि जे लिहिले आहे त्या सूचनेप्रमाणे पुन्हा एकदा शपथ घेण्यास सांगीतल.
अध्यक्ष म्हणाले, ‘जे लिहिलं आहे तेच वाचायला सांगितलं. असं चालणार नाही, जे मराठीत लिहिलं आहे तेच वाचावं लागेल, तशीच शपथ घ्यावी लागेल, असं सांगितलं. त्यानंतर मग नागेश पाटील आष्टीकर यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली. यावेळी त्यांनी अन्य नावांचा उल्लेख टाळत जशी लिहिली आहे तशीच शपथ घेतली.’ दरम्यानचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.