नगर, (प्रतिनिधी) – बांधकाम व्यावसायिकाला बांधकाम परवानगी देण्यासाठी नगर महापालिकेचे आयुक्त डाॅ. पंकज जावळे यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकामार्फत ९ लाख ३० हजारांची लाच माहितली होती.
तडजोडी अंती ८ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील पथकाने गुरुवार (दि. २७) रोजी नगर येथे मोठी कारवाई केली. गुरुवारी दुपारी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जावळे यांचे दालन सील करण्यात आले.
याबाबत डाॅ. पंकज जावळे ( महापालिका आयुक्त), स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे (पद लिपीक, अतिरिक्त पदभार स्विय सहायक आयुक्त, महापालिका) असे ताब्यात घेतलेल्या लाचखोरांची नावे आहेत.
तक्रादार हे त्यांचे भागीदारांसह ४ के रियाल्टी या नावाने बांधकाम व्यवसाय करतात. त्यांनी नगर महापालिका हद्दीत नालेगाव येथे २२६०.२२ चौरस मीटर प्लाॅट खरेदी केला. सदर प्लाॅटवर तक्रादार यांना त्याचे भागीदारांसह बांधकाम करावयाचे असल्याने त्यांनी बांधकामासाठी लागणारी बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी दि. १८ मार्च २०२४ रोजी आॅनलाईन अर्ज केला होता.
सदर परवानगी साठी आयुक्त डाॅ. पंकज जावळे यांनी त्याचे स्वीय सहाय्यक शेखर देशपांडे यांच्या मार्फत ९ लाख ३० हजारांची लाचेची मागणी केली. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (दि.१९) रोजी तक्रार केली.
त्यानुसार लाचलुचपत विभागाने पडताळणी दरंम्य़ान स्वीय साहय्यक देशपांडे यांनी मनपा आयुक्त जावळे यांच्याकडून बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी ८ लाख रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केली.
लाच मागणी दरम्य़ान मनपा आयुक्त हे देशपांडे यांना तक्रादार यांच्याकडे लाच मागणी करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
ही कारवाई लाचलुचविभागाचे पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शानाखाली सहाय्यक सापळा अधिकारी शंकर मुटेकर, पोलीस गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश चेके, गणेश बुजाडे, शिवलिंग खुळे, अतिश तिडके, गजानन खरात, विठ्ठल कापसे, भालचंद्र बिनोरकर यांच्या पथकाने केली.