मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार तर कधी हलक्या सरी दिसत आहे अशात हवामान विभागाने येत्या १ तारखेला सोमवारी शहरात .रेड अलर्ट जाहीर केलाय. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदारांची धावपळ उडण्याची शक्यता आहे. मुंबईत हवामान विभागाने सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे मोसमी पाऊस सक्रिय होऊ शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन-चार दिवस पावसाचा जोर कायम असेल. मुंबईतील अनेक भागात शनिवारी चांगला पाऊस पडला. दादर, परळ आणि मुंबई सेंट्र्लमध्ये जोरदार पाऊस झाला. येत्या दिवसांमध्ये ठाणे आणि पालघरमध्ये मुसळघार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारपासून पावसाचा जोर वाढेल. मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम पाऊस पडेल.
राज्यातही अनेक ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भ आणि कोकणात पाऊस चांगला पडण्याचा अंदाज आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर कोकणामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.