नैरोबी : केनियामध्ये अर्थसंकल्पामध्ये सुचवण्यात आलेल्या करवाढीच्या प्रस्तावाच्या निषेधार्थ तीव्र हिंसक आंदोलन सुरू झाले आहे. बुधवारी शेकडो हिंसक आंदोलकांनी थेट संसदेवर चाल करून संसदेची इमारतच पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीमारही केला.तरी आक्रमक जमावाने संसदेच्या आवारात घुसखोरी केली आणि संसदेचा काही भाग पेटवण्याचा प्रयत्न केला.
या धुमश्चक्रीमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात किमान ६ जण ठार झाले. तर शेकडो जण जखमी झाले होते. काल दिवसभर चाललेल्या धुमश्चक्रीनंतर आज राजधानी नैरोबीच्या परिसरात तणावपूर्ण शांतता होता. शहराच्या मुख्य भागातून पोलीस आणि सैनिकांची गस्त सुरू झाली आहे. जाळपोळ झालेल्या संसदेच्या आवारातील स्वच्छता देखील केली जाते आहे. संसद, शहरातील प्रमुख सभागृह आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आवारामध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे.