पुणे, – लोकसभेला भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) विधानसभा निवडणूक महायुतीसोबत लढणार, की स्वबळावर याचा निर्णय जाहीर केलेला नाही. पण, पुण्यात मनसेकडून विधानसभेच्या आठही जागांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून राज्यातील २०० पेक्षा अधिक जागांचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यात पुण्यातील आठही जागांचा समावेश आहे, अशी माहिती पक्षाचे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर यांनी दिली.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड, शिवाजीनगर, कॅन्टोंन्मेंट, हडपसर, कसबा या पाच मतदार संघांतून मनसेने निवडणूक लढविली होती. मात्र, एकाही जागेवर त्यांना यश आले नव्हते.
मनसेने मतदारसंघनिहाय सर्वेक्षणाची जबाबदारी एका खासगी संस्थेकडे दिली होती. त्यांनी पहिला अहवाल सादर केला असून, दुसरा अहवाल पुढील महिन्यात सादर केला जाणार आहे.
त्यानंतर मनसेचे राज्य पदाधिकारी प्रत्येक मतदारसंघात जाऊन आपल्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन इतर राजकीय पक्षातील कोणते उमेदवार असतील, मनसेने जागा लढावी की नाही, उमेदवार कोण असेल याचा अहवाल तयार करून पक्षाच्या अध्यक्षांना सादर करणार आहेत.
त्यानुसार पुणे जिल्ह्यातील २१ जागांची चाचपणी मनसे करत आहे. पुण्यात यंदा आठही जागा लढविण्यासाठी पक्षाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.
पर्वतीमध्ये अनपेक्षित उमेदवार
मनसेकडून शहरात प्रामुख्याने कोथरूड, कसबा, हडपसर तसेच वडगावशेरी, कॅन्टोन्मेंट तसेच खडकवासला मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
तर पर्वती विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू असून, येथे मनसेकडून अनपेक्षित उमेदवार पुढे आणला जाण्याची शक्यता आहे. हा उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षाचा नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मनसेकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार, याची चर्चा चांगलीच रंगली आहे.