Milind Narvekar | राज्यात विधानपरिषदेच्या उमेदवारीवर सर्व पक्षाकडून चर्चा सुरु आहे. त्यात काल भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली.. त्यानंतर आता मविआमधील त्यांच्या उमेदवारीवर सध्या चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान, एकेकाळी उद्धव ठाकरे यांचा उजवा हात अशी ओळख असलेले आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना ठाकरे गटाकडून विधानपरिषदेच्या 11 व्या जागेवरुन निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आल्याची चर्चा काल रंगली होती. मात्र, काहीवेळातच मिलिंद नार्वेकर हे अर्ज भरणार नसल्याची बातमीही ठाकरेंच्या गोटातून समोर आली. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीवरुन काहीवेळ संभ्रम निर्माण झाला आहे.
विधानपरिषदेच्या या जागेवरुन ठाकरे गटाकडून माजी खासदार विनायक राऊत यांनाही संधी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, सोमवारी संध्याकाळी अचानक मिलिंद नार्वेकर यांचे नाव अचानक चर्चेत आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे.
निवडणूक होणार कि बिनविरोध ? सस्पेन्स कायम Milind Narvekar |
विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ठाकरे गट 11 व्या जागेवरुन उमेदवार रिंगणात उतरवणार का, हे बघावे लागेल. विधान परिषदेची 12 जुलैला होणारी निवडणूक होणार की बिनविरोध, हा सस्पेन्स अजूनही कायम आहे. महाविकास आघाडीने तीन जागा लढवल्यास निवडणूक चुरशीची होईल. महाविकास आघाडीत काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच शेकापचे जयंत पाटील सुद्धा आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शरद पवार गटाने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, ठाकरे गटाने तिसरा उमेदवार रिंगणात उतरवल्यास शरद पवार गटाला मविआचा धर्म पाळावा लागू शकतो.
मिलिंद नार्वेकरांच्या उमेदवारीबाबत संभ्रम Milind Narvekar |
शिवसेना ठाकरे गट तिसरा उमेदवार देण्याच्या तयारीत, मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा, मात्र यावर अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही. शिवसेना ठाकरे गटाने विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून तिसरा उमेदवार दिल्यास विधान परिषदेची निवडणूक होणे अटळ आहे. महाविकास आघाडीचे सध्याचे संख्याबळ पाहता तिसरा उमेदवार निवडून आणण्यास पाच ते सहा मतांची गरज आहे. महायुतीकडून भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे दोन उमेदवार आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.