पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील रस्त्यांवर वाढत असलेली वाहतूक कोंडी, वायू प्रदूषण, तसेच स्वत:चे वाहन असल्याने पेट्रोल- डिझेलमुळे होणाऱ्या खर्चाला फाटा देत कोंडीमुक्त प्रवासासाठी पुणेकरांकडून मेट्रो सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जून महिन्यात मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या सरासरी ९३ हजारांवर पोहोचली आहे. विशेषत: मार्च २०२४ मध्ये मेट्रोचा रूबी हाॅल ते रामवाडी विस्तारीत मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्येत गेल्या साडेतीन महिन्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. हा मार्ग सुरू होण्यापूर्वी ही प्रवासी संख्या ५० ते ६० हजारांच्या आसपास स्थिरावली होती.
महामेट्रोकडून वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी- चिंचवड असा सुमारे ३३.२ किलोमीटरचा मेट्रो मार्ग उभारला जाणार आहे. त्यातील २९.५८ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, केवळ साडेतीन किलोमीटरचे दिवाणी न्यायालय ते स्वारगेट हे भूमिगत मेट्रोचे काम शिल्लक आहे.
त्यातही हे काम अंतिम टप्प्यात असून, विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै अथवा ऑगस्टमध्ये हा मार्ग सुरू होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, सध्या सुरू करण्यात आलेल्या मार्गामुळे नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक सक्षम पर्याय मिळाल्याने पुणेकरांकडून मेट्रोला चांगली पसंती मिळत आहे.
पिंपरी चिंचवडमधून १३ हजार प्रवासी
महामेट्रोकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शहरात पिंपरी- चिंचवड मेट्रो स्टेशन आणि पुणे रेल्वे स्टेशन मेट्रो स्थानकांत दैनंदिन प्रवासी संख्या वाढली आहे. पिंपरी- चिंचवड मधून अवघ्या २० ते २५ मिनिटांत थेट पुण्यात येता येत असल्याने या स्थानकावरील दैनंदिन प्रवासी संख्या दिवसाला सरासरी १३ हजार ३०० वर गेली आहे,
तर पुणे रेल्वे स्थानकावर दैनंदिन प्रवासी संख्या ९ हजार २०५ वर गेली आहे. पुणे रेल्वे स्थानकावर प्रवासी आल्यानंतर त्यांना आता पिंपरी- चिंचवड, तसेच नगर रस्ता आणि कोथरूड भागात जाण्यासाठी मेट्रोची थेट सुविधा आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर येण्यासाठी, तसेच जाण्यासाठी प्रवासी मेट्रोला पसंती दर्शवित असल्याचे चित्र आहेत.