Match-Fixing At T20 World Cup 2024 :- टी-२० विश्वचषक आता सुपर8 फेरीकडे वळला आहे. आता ८ संघांमध्ये पुढील फेरी गाठण्याची चुरस रंगणार आहे. सुपर ८ मधील सामने १९ जूनपासून सुरूवात होणार आहेत. पण तत्त्पूर्वी मॅच फिक्सिंगचे मोठे प्रकरण समोर आले. एका अहवालानुसार, गट फेरीतील सामन्यांदरम्यान मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका युगांडाच्या संघातील एका खेळाडूला यासाठी फोन करण्यात आले पण त्याने आयसीसीकडे तक्रार केली.
टी-२० विश्वचषक २०२४ च्या गट सामन्यांदरम्यान युगांडाच्या एका खेळाडूशी मॅच फिक्सिंगसाठी संपर्क साधण्यात आला होता. केनियाच्या एका माजी जलदगती गोलंदाजाने त्याला मॅच फिक्सिंगसाठी वेगवेगळ्या नंबरवरून कॉल केला. महत्त्वाची बाब म्हणजे युगांडाच्या खेळाडूने याबाबत आयसीसीकडे तक्रार केली. आयसीसीने तात्काळ याची दखल घेत प्रकरण मिटवलं आहे.
युगांडाच्या खेळाडूने आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी प्रोटोकॉलचे पालन करत तेथे उपस्थित असलेल्या भ्रष्टाचारविरोधी युनिटला तात्काळ माहिती दिली. मात्र केनियाच्या या माजी खेळाडूची ओळख उघड केली नाही. अधिकाऱ्यांनी यावर तात्काळ कारवाई करत सर्व संघांना केनियाच्या या खेळाडूपासून सावध राहण्यास सांगितलं आहे. मॅच फिक्सिंगशी संबंधित गुन्ह्यांबाबत आयसीसीने अनेक कठोर नियम केले आहेत. यासाठी भ्रष्टाचारविरोधी प्रोटोकॉलही बनवण्यात आला आहे.
आयसीसीच्या एका सूत्राने सांगितले की, मॅच फिक्सिंगबाबत युगांडाच्या खेळाडूशी संपर्क साधण्यात आला ही फारशी आश्चर्यकारक बाब नाही. मोठ्या संघांच्या सामन्यांच्या वेळेस सहयोगी राष्ट्र संघांना लक्ष्य करणं सोपे जाते, पण या प्रकरणात खेळाडूने ताबडतोब आयसीसीला माहिती देऊन चांगले काम केले. या ऑफरबाबत युगांडाच्या खेळाडूने आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी टीमला वेळेवर सांगितले नसते तर त्यालाही यात गुन्हेगार मानले गेले असते.
टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये युगांडाने एकूण ४ गट सामने खेळले. युगांडाचा संघ वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि पापुआ न्यु गिनीसोबत क गटात होता. गट सामन्यांमध्ये युगांडा संघाने १ सामना जिंकला आणि ३ सामने गमावले. युगांडाने पीएनजीवर ३ गडी राखून विजय मिळवला होता. अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडविरुद्ध संघाला पराभव पत्करावा लागला.