Maratha Kunbi Records। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण चांगलेच तापल्याचं दिसतंय. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी नुकतेच उपोषण करुन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देण्याचे लेखी आश्वासन सरकारकडून घेतले होते. या आंदोलनावेळी लक्ष्मण हाके यांनी बोगस कुणबी दाखल्यांचा मुद्दादेखील उपस्थित केला होता. यानंतर आता लक्ष्मण हाके यांचे सहकारी सतीश कुलाल यांनी बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
माहितीच्या अधिकारातून कागदपत्र मागवण्याची प्रक्रिया सुरु Maratha Kunbi Records।
लक्ष्मण हाके यांचे सहकारी असणारे सतीश कुलाल यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणून दिलेले दाखले तपासण्यासाठी माहितीच्या अधिकारातून कागदपत्र मागवण्याची प्रक्रिया सुरु केली असल्याचे सांगण्यात येतंय. त्यासाठी कुलाल यांनी माळशिरस तालुक्यात अर्ज दाखल केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील एकाही व्यक्तीचे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाले तर याद राखा, असा इशारा दिला होता. मात्र, आता लक्ष्मण हाके यांच्या सहकाऱ्याने बोगस कुणबी दाखले रद्द करण्याच्यादृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. त्यामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
36 जिल्ह्यातील 353 तालुक्यातील नोंदी गोळा करणार Maratha Kunbi Records।
सतीश कुलाल यांनी दाखल केलेल्या आपल्या अर्जात कुणबी प्रमाणपत्र दिल्या त्या सर्व नोंदींची यादी आणि त्याला जोडलेले पुरावे, माहितीच्या अधिकारातंर्गत मागवून घेतले आहेत. अनेक कुणबी दाखल्यांमध्ये फेरफार आणि खाडाखोड करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे आता ओबीसी समाजाकडून महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातील 353 तालुक्यातील नोंदी पुढील महिनाभरात गोळा केल्या जाणार आहेत. त्यानुसार नव्याने लागू करण्यात आलेल्या सर्व कुणबी दाखल्यांची तपासणी करुन बोगस दाखले रद्द करायला लावू, असे सतीश कुलाल यांनी यांनी यावेळी म्हटले.