मालेगाव : मालेगावात माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच माजी नगरसेवक अझीझ लल्लू व त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या हाताची बोटेही कापण्यात आली आहेत.
दरम्यान अझीझ लल्लू व त्यांचा मुलगा मशिदीतून नमाज पाठणानंतर बाहेर पडले. त्यानंतर मदिना चौकात हल्लेखोरांनी अझीझ लल्लू व त्यांच्या मुलावर धारदार शस्त्रांनी एकापाठोपाठ वार केले. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
त्यांच्या मुलाच्या पाठीवर वार करण्यात आले आहेत. या दोघांनाही रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती सध्या गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
हा हल्ला जमिनीच्या वादातूनच झाल्याची माहिती आहे. त्याचे आणि नातेवाईकांचे जमिनीवरुन वाद सुरु असल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणा आणली.
माजी महापौरावर गोळीबार
26 मे 2024 रोजी मालेगावाचे माजी महापौर आणि एमआयएम पक्षाचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. हल्ल्यामध्ये मलिक गंभीररित्या जखमी झाले होते.
मालेगावातील मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गजवळ माजी महापौर अब्दुल मलिक युनूस ईसा चहा पिण्यासाठी एका हॉटेलमध्ये बसले होते. याचवेळेस बाइकवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर अगदी जवळून तीन वेळा गोळ्या झाडल्या आणि फरार झाले होते. या हल्ल्यात मलिक गंभीर स्वरुपात जखमी झाले होते.