राजूर, (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी शासनाने व शाळेने दिलेल्या सुविधांचा वापर करून खूप प्रगती करावी, असे आवाहन अकोले आगार व्यवस्थापक सोनाली संगमकर यांनी केले.
मुलींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेचे पास वाटप करताना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर सागर सांगळे, संस्थेचे सचिव बापू काळे वाहतूक नियंत्रक अधिकारी देशमुख व गंभीरे ,प्राचार्य किरण भागवत उपस्थित होते.
दरवर्षी मुलींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना राबविली जाते. यावेळी या योजनेच्या अनुषंगाने अकोले आगार व्यवस्थापक सोनाली संगमकर यांनी स्वतः शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे पास वाटप केले .जामगाव, माणिक ओझर , कौठवाडी, जामवाडी याठिकाणी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोफत पास वाटपाचा कार्यक्रम त्यांच्याहस्ते संपन्न झाला.
संस्थेचे सचिव बापू काळे यांनीही राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून धावपळ करून विद्यार्थ्यांना पास उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.
विद्यार्थ्यांना महिला अधिकाऱ्यांचा आदर्श घेऊन भविष्यात अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगा, असे सांगून त्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक प्राचार्य किरण भागवत यांनी केले. सूत्रसंचालन विनायक साळवे यांनी तर आभार साहेबराव कानडे यांनी मानले.