Delhi Airport । राजधानी दिल्लीत काल मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. अशात २८ जूनच्या पहाटे ५:३० च्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 चे छत कोसळले. यावेळी तिथे आग लागली असून त्याठिकाणी उपस्थित अनेक वाहने कोसळल्या छताखाली अडकल्याची माहिती मिळत आहे. आता पर्यंत तीन जण गंभीर जखमी झाले. तर एका पेक्षा जास्त जण अजूनही तिथे अडकले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
या घटनेची माहीती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. या घटनेबाबत दिल्ली अग्निशमन सेवेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की,’सकाळी 5.30 च्या सुमारास आम्हाला दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 वर छत कोसळल्याची माहिती मिळाली. तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.’
#WATCH | 4 people were injured after a roof collapsed at the Terminal-1 of Delhi airport.
(Video source – Delhi Fire Service) pic.twitter.com/Uc0qTNnMKe
— ANI (@ANI) June 28, 2024
या दुर्घटनेनंतर केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी X वर पोस्ट करत लिहिले…
‘दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-1 ( T1 ) वर छत कोसळण्याच्या घटनेवर मी वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून आहे. प्रथम बचाव पथक घटनास्थळी काम करत आहेत. तसेच विमान कंपन्यांना T1 वर सर्व प्रभावित प्रवाशांना मदत करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे.’
या अपघाताची फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोत टर्मिनलचे अवजड छत वाहनांवर पडले आहे. कारमध्ये बसलेले लोकही यात चिरडले. मोठ्या कष्टाने त्याची सुटका झाली. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, हवामान खात्याने अलर्ट जारी केला होता. हवामान खात्याने दिल्लीत २९ आणि ३० जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय, 28 जून रोजी आयएमडीने दिल्ली आणि आसपासच्या भागात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला होता. आयएमडीनुसार, या संपूर्ण आठवड्यात दिल्लीचे कमाल तापमान 34 ते 37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 ते 28 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.