पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेले 5 जण वाहून गेले आहेत. धक्कादायक म्हणजे वाहून गेलेले 5 जण एकाच कुटुंबातील होते. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल येथून हे कुटुंब वाहून गेले.
काय घडले नेमके?
भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्याला रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून ओळखलं जातं.अन्सारी कुटुंब रविवारी परिवारासोबत वर्षाविहारासाठी या परिसरात आले होते. हे सर्वजण पाण्याच्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी गेले मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दुर्दैवाने हे सगळेजण वाहून गेले. वाहून गेलेल्यांमध्ये लहान मुलांचा आणि महिलांचादेखील समावेश आहे.
भुशी धरण ओव्हरफ्लो
पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या लोणावळ्यातील भुशी धरण सध्या ओव्हरफ्लो झाले आहे. लोणावळा परिसरात शुक्रवार, शनिवारी झालेल्या जोरदार पावसाच्या सरी आणि आज रविवारी सकाळपासून झालेला पाऊस यामुळे भुशी धरण ओसंडून वाहू लागले आहे.