Lok Sabha Speaker । Pro-tem Speaker – लोकसभा निवडणुका संपून नव्या सरकारच्या स्थापनेनंतर आता १८ व्या लोकसभेचे प्रत्यक्ष कामकाज लवकरच सुरु होत आहे. सुरुवातीला सर्व नव्या खासदारांचे शपथविधी आणि लोकसभा अध्यक्षांची निवड होईपर्यंत एक प्रोटेम स्पिकर अर्थात हंगामी अध्यक्ष निवडले जातात. या पदासाठी भाजपचे खासदार भर्तृहरी माहताब यची नियुक्ती सरकार पक्षातर्फे करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या निवडीवरुनही काहहीवाद निर्माण झाला आहे.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, सात वेळा लोकसभेचे सदस्य राहिलेले भर्तृहरी माहताब नवीन खासदारांना शपथ देतील आणि लोकसभा अध्यक्षांच्या निवडीपर्यंत ते पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील. मात्र, भर्तृहरी माहताब यांच्या नावावरून वाद निर्माण झाला असून काँग्रेसने भर्तृहरी माहताब यांना प्रोटेम स्पीकर बनवणे हे संसदीय नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
प्रोटेम स्पीकर म्हणजे काय?
लोकसभेचे पीठासीन अधिकारी असल्याने, लोकसभेच्या कामकाजात सभापतींची महत्त्वाची भूमिका असते. बहुमताच्या आधारे सभापती निवडला जातो, परंतु जोपर्यंत सभापती निवडला जात नाही तोपर्यंत लोकसभेतील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी प्रोटेम स्पीकर अर्थात हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते. प्रोटेम स्पीकर या पदाचा घटनेत उल्लेख नाही. पण संसदीय कामकाज मंत्रालयाच्या नियमावलीत प्रोटेम स्पीकरची नियुक्ती आणि शपथ यांचा उल्लेख आहे.
प्रोटेम स्पीकरची निवड कशी करतात?
संसदीय कामकाज मंत्रालयाच्या नियमांनुसार, नवीन लोकसभेद्वारे अध्यक्षाची नियुक्ती होईपर्यंत, अध्यक्षाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी राष्ट्रपती सभागृहाच्या सदस्याची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करतात. नवीन लोकसभेच्या सदस्यांना पदाची शपथ देणे हे प्रोटेम स्पीकरचे प्राथमिक कर्तव्य आहे.
नियमानुसार, खासदारांना शपथ देण्यासाठी राष्ट्रपतींकडून इतर तीन लोकसभा खासदारांचीही नियुक्ती केली जाते. साधारणपणे, संसदेच्या सर्वात ज्येष्ठ खासदाराला प्रोटेम स्पीकर बनवले जाते, परंतु यात काही अपवाद असू शकतात. लोकसभेच्या निवडून आलेल्या इतर तीन सदस्यांनाही खासदारांसमोर शपथ घेण्यासाठी राष्ट्रपती नियुक्त करतात.
नियमावलीनुसार, सभागृहाच्या सदस्यत्वाच्या वर्षांच्या संख्येनुसार सर्वात ज्येष्ठ सदस्य सामान्यतः या उद्देशासाठी निवडले जातात, जरी अपवाद असू शकतात. नवीन सरकार स्थापन होताच सरकारचा विधिमंडळ विभाग लोकसभेच्या ज्येष्ठ खासदारांची यादी तयार करतो.
ही यादी संसदीय कामकाज मंत्री किंवा पंतप्रधानांना पाठवली जाते. पंतप्रधानांच्या मंजुरीनंतर संसदीय कामकाज मंत्री प्रोटेम स्पीकर आणि इतर तीन खासदारांच्या नावांची माहिती राष्ट्रपतींना देतात. तेथून मंजुरी मिळाल्यानंतर नावे जाहीर केली जातात.
नवीन खासदार कसे घेतात शपथ?
राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाल्यानंतर, मंत्रालय नियुक्त प्रोटेम स्पीकर आणि इतर खासदारांच्या पॅनेलला नियुक्तीबद्दल सूचित करते. यानंतर, राष्ट्रपती राष्ट्रपती भवनात प्रोटेम स्पीकरना शपथ देतात.
तर खासदारांच्या पॅनेलला प्रोटेम स्पीकरद्वारे शपथ दिली जाते. यानंतर प्रोटेम स्पीकर इतर सर्व खासदारांना शपथ देतात. लोकसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच खासदारांना शपथ दिली जाते.
भर्तृहरी माहताब यांच्या नावावरून काय आहे वाद?
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी भृथरी महताब यांच्या नावाची घोषणा करताच काँग्रेसने विरोध सुरू केला. काँग्रेसचे म्हणणे आहे की त्यांच्या पक्षाचे आठ वेळा खासदार असलेले कोडिकुनिल सुरेश हे सर्वाधिक ज्येष्ठ खासदार आहेत, त्यामुळे त्यांना लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले जावे.
भर्तृहरी माहताब सात वेळा खासदार आहेत. ज्येष्ठतेकडे दुर्लक्ष करून भाजप संसदीय नियम मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, परंपरेनुसार ज्या खासदाराने संसदेत जास्तीत जास्त कार्यकाळ काम केले आहे, त्यालाच हंगामी सभापती म्हणून नियुक्त केले पाहिजे.
कोण आहेत भर्तृहरी माहताब?
भर्तृहरी माहताब 8 सप्टेंबर 1957 रोजी भद्रक, ओडिशा येथे जन्मलेले, ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री डॉ. एच. माहताब यांचे पुत्र आहेत. माहताब हे नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील पक्ष बिजू जनता दलाचे संस्थापक सदस्य आहेत आणि एकेकाळी नवीन पटनायक यांच्या खूप जवळचे होते.
ते बीजेडीच्या तिकीटावर सहा वेळा लोकसभेत पोहोचले. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भर्तृहरी माहताब यांनी बीजेडी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि आता भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकून ते लोकसभेत पोहोचले आहेत.