Lok Sabha Result 2024 | आंध्रप्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या विजयामध्ये जनसेना पार्टीचे प्रमुख आणि अभिनेते पवन कल्याण हे मॅन ऑफ द मॅच ठरले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत दोन जागांवरून पराभूत झालेल्या पवन कल्याण यांनी चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसम आणि भाजपबरोबर आघाडी केली होती.
जागावाटपामध्ये टीडीपीने विधानसभेच्या १४४ आणि लोकसभेच्या १७ जागांवरून निवडणूक लढवली तर भाजपने लोकसभेच्या ६ आणि विधानसभेच्या १० जागांवर उमेदवार उभे केले.
जनसेनेने लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या २१ जागा लढवल्या आणि त्यांच्या पक्षाचे उमेदवार सर्वच जागांवर आघाडीवर होते. या आघाडीमुळे आंध्रमध्ये एनडीएला लोकसभा आणि विधानसभा दोन्हीमध्ये चांगले यश मिळाले.
तुरुंगात असलेल्या चंद्रबाबू नायडू यांच्याशी आघाडी करणारे पवन कल्याण हे पहिले नेते होते. त्यांच्या या घोषणेमुळे तेलगू देसम पक्षाचा आत्मविश्वास वाढला आणि त्याचा फायदा निवडणुकीत झाला.
२०१४ मध्ये विधानसभेची एकच जागा जिंकलेल्या पवन कल्याण यांच्या पक्षाने आता ६ जागांवर विजय मिळवला आहे. तसेच १५ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर होते. मतविभाजन टाळण्यासाठी आघाडी करणारे पवन कल्याण हे लोकसभा आणि विधानसभेसाठीही किंगमेकर ठरले आहेत.