Live Cricket Score (T20 World Cup 2024, Super 8, IND vs AUS) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (सोमवारी) सुपर एटमधील गट 1 मधील महत्त्वाचा सामना पार पडला. मागील सामना गमावलेल्या ऑस्ट्रेलियासाठी हा सामना ‘करो या मरो’ अशा स्थितीचा होता. अशा या सामन्यात रोहित शर्मानंतर अर्शदीप सिंगच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव करत टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
रोहित शर्माच्या 92 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 5 विकेट गमावून 205 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 20 षटकांत 7 विकेट गमावून 181 धावाच करू शकला आणि त्यांना सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघाच्या उपांत्य फेरीतील आशांना मोठा धक्का बसला आहे.
ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने 43 चेंडूंत नऊ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 76 धावा केल्या. त्याने कर्णधार मिचेल मार्शसोबत दुसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली.कर्णधार मिचेल मार्शने 37 धावांची खेळी केली. एकेकाळी ऑस्ट्रेलियन संघ हा सामना जिंकेल असे वाटत होते, पण भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत स्पर्धेत आपली विजयी मोहीम सुरू ठेवली. भारताकडून गोलंदाजीत अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 बळी घेतले. याशिवाय कुलदीप यादवने चार षटकांत 24 धावा देत दोन बळी घेतले.
यासह भारताने गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाचा बदला घेतला. त्यावेळी अंतिम फेरीत विजय मिळवत ऑस्ट्रेलियानं भारताचे विजेतेपदाचे स्वप्न भंग केले होते आणि आता भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करत त्यांचा पुढचा मार्ग खडतर केला आहे. भारताने सुपर एट टप्प्यातील तिन्ही सामने जिंकले आणि सहा गुणांसह गट एकमध्ये अव्वल स्थान पटकावले.तीन सामन्यांत दोन पराभव आणि एक विजयासह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचे दोन सामन्यांतून एक विजय आणि एक पराभवासह दोन गुण आहेत आणि ते तिसऱ्या स्थानावर आहे.
मंगळवारी सकाळी अफगाणिस्तानला बांगलादेशचा सामना करायचा आहे आणि तो सामना जिंकण्यात संघ यशस्वी ठरला तर उपांत्य फेरीत प्रवेश करेल आणि ऑस्ट्रेलियाचा प्रवास इथेच संपेल.उपांत्य फेरीत भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होणार आहे. याआधीही 2022 मध्ये दोन्ही संघ अंतिम चारमध्ये आमनेसामने आले होते जिथे इंग्लंड संघ विजयाची नोंद करण्यात यशस्वी ठरला होता. दोन्ही संघांमधील हा सामना 27 जून रोजी रात्री 8 वाजता गयाना येथे होणार आहे.
तत्पूर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माच्या 92 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 5 बाद 205 धावसंख्येपर्यत मजल मारली होती. या विश्वचषकात भारताने 200 धावा करण्याची ही पहिलीच वेळ होती.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि जोश हेझलवूडने विराट कोहलीला खाते न उघडताच बाद करून कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. मात्र, रोहित आज वेगळ्याच रंगात दिसला आणि त्याने तुफानी फलंदाजी करत कांगारू संघाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या काळात रोहितने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
Innings Break!
Captain Rohit Sharma led from the front as #TeamIndia post a total of 205/5 🙌
Over to our bowlers now! 👍
Scorecard ▶️ https://t.co/L78hMho6Te#T20WorldCup | #AUSvIND pic.twitter.com/djk7WWCvI6
— BCCI (@BCCI) June 24, 2024
डावातील तिसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या स्टार्कच्या षटकात रोहितने 29 धावा केल्या आणि जोरदार फलंदाजी सुरू ठेवली. रोहित एकेकाळी शतकाकडे वाटचाल करत होता, पण स्टार्कने त्याचा डाव संपवला. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने शानदार फॉर्मात असलेला कर्णधार रोहित शर्माला बाद करून भारताला तिसरा धक्का दिला. रोहित या सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता आणि शतकाकडे वाटचाल करत होता, पण स्टार्कने गोलंदाजी करत भारतीय कर्णधाराचा डाव संपवला. रोहित 41 चेंडूत 7 चौकार अन् 8 षटकारासह 92 धावा करून बाद झाला. रोहित भलेही शतक झळकावण्यापासून चुकला असेल, पण टी-20 विश्वचषकातील ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे.
रोहित बाद झाल्यानंतर भारताचा डाव थोडा मंदावला असला तरी सूर्यकुमार यादव (16 चेंडूत 31), शिवम दुबे (22 चेंडूत 28 धावा) आणि हार्दिक पंड्या (17 चेंडूत 27 नाबाद धावा) यांनी काही चांगले फटके खेळले आणि संघाची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. त्याचवेळी विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि स्पर्धेत दुसऱ्यांदा खातेही न उघडता माघारी परतला. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने 14 चेंडूत 15 धावांची खेळी केली. तर रविंद्र जडेजा 5 चेंडूत 9 धावांवर नाबाद माघारी परतला.
ऑस्ट्रेलियासाठी जोश हेझलवूडने अतिशय किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकात केवळ 14 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. तर मिचेल स्टार्क आणि मार्कस स्टॉइनिस यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. स्टार्कने 4 षटकात 45 तर स्टाइनिसने 4 षटकात 56 धावा दिल्या. पॅट कमिन्स आणि अॅडम झम्पा यांना तर एकही गडी बाद करता आला नाही. कमिन्सने 4 षटकात 48 तर झम्पानं 4 षटकात 41 धावा दिल्या.