Laxman Hake | Manoj Jarange | Maratha Reservation | OBC Reservation : एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीलयांनी मराठा आरक्षण ओबीसीतून मिळावे या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे आता मराठा विरुद्ध ओबीसी वादामुळे राज्यात वातावरण तापत आहे.
लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज नऊवा दिवस आहे. अश्यातच, राज्य सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली असून राज्यसरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणस्थळी भेट घेतली. या भेटीवेळी शिष्टमंडळाने त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
मात्र हाके आणि वाघमारे आंदोलनावर ठाम आहेत. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष्मण हाके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा करून दिली. या दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधलाय. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की, “मिस्टर जरांगे तुम्हाला आरक्षणातलं पॉईंट शुन्यसु्द्धा ज्ञान नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली. मंडल आयोग लागू होऊन 27 ते 28 वर्षे झाली आहेत आणि 70 वर्षांचा जावयी शोध जरांगे काढला कुणी? म्हणून मी कायम सांगतो, जरांगे तुमची माझ्यासमोर बोलायची लायकी नाही. तुमच्या सल्लागारांना माझ्यासमोर बोलायला सांगा.
कारण मंडल आयोग 1993-94 मध्ये लागू झाला, आणि 70 वर्षे आणले कुठून? अरे याला आधी शिक्षण द्या. याला अगोदर पॉलिसी शिकवा. माझी चिडचिड होते मला मान्य आहे.
मी थोडसं एकेरी बोलतोय. पण आमच्या या वेदना आहेत, म्हणून हे शब्द येत आहेत. 70 वर्षे कुणाचे खायचा प्रश्नच येत नाही. 27 वर्षांत काय मिळालं?” असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला.
“मनोज जरांगे नेहमी आमचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांना टार्गेट करुन म्हणतात की, भुजबळ तू सगळं खाल्लं आहे. या जरांगेंना माझ्या एक सवाल आहे. या महाराष्ट्रात आताचं कालचंसुद्धा बजेट, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा 60 टक्के ओबीसींना शंभर टक्क्यांपैकी एक टक्के सुद्धा बजेट ओबीसींसाठी राबवलं नाही.
जरांगे कायदा बनवणारे कोण आणि त्याची अंमलबजावणी करणारे कोण? आमदार कोण, खासदार कोण आणि मुख्यमंत्री कोण? मराठेच ना? ओबीसीला एक टक्का बजेट कुणी देत नाही.’ असं देखील लक्ष्मण हाके यावेळी म्हणाले.
‘तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं तर नाव बदलेन’; जरांगेचा भुजबळांना गंभीर इशारा
ओबीसी आंदोलक आमचे विरोधकच नाहीत. तो येवलावाला काड्या करत आहे. लक्ष्मण हाकेंना भुजबळांनीच उभे केले आहे. ओबीसी आंदोलनाला भुजबळच सगळे पुरवत आहेत.
तुमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केले तर नाव बदलेन, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना दिला आहे.