Ladki Bahin Yojana | Eknath Shinde | Vijay Wadettiwar – पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाची घोषणा केली. त्यानंतर मुख्यंत्र्यांनी शनिवारी विधानसभेत या योजनेबाबतचा जीआर काढल्याची माहिती सभागृहाला दिली.
शिवाय विधानसभा अध्यक्षांनीही ते वाचून दाखवले. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. ही कृती म्हणजे हक्कभंग असल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी सांगितले. यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू होण्याआधीच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, अजून अर्थसंकल्पाला मान्यता मिळालेली नाही. तरीही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत येवून त्याची पुन्हा घोषणा केली. हा प्रकार काय आहे. शिवाय अर्थ मंत्र्यांच्या अधिकारातही मुख्यमंत्र्यांचा हा हस्तक्षेप आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यां विरोधात हक्कभंग आणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यात लागू होईल. त्याचा तातडीने लाभ मिळण्यास सुरूवात होईल. त्याचा जीआरही काढला गेला आहे, अशी माहिती विधानसभेत दिली. मात्र यानंतर विरोधी पक्षाने जोरदार पलटवार करत मुख्यमंत्र्यांचीच कोंडी केली.
हा प्रकार म्हणजे श्रेयवादाची लढाई आहे. शिवाय यात मुख्यमंत्री कुरघोडी करत आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. असा जीआर दाखवणे खरोखर योग्य आहे का? हा हक्कभंग होत नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
नव्या योजनेचा लेखा शीर्ष तयार झालेला नाही. योजनेसाठी साडेचार हजार कोटी लागणार आहेत. त्याची तरतूद कुठून करणार हे माहित नाही. शिवाय जीआर पाहिल्यानंतर राज्यातल्या केवळ पंधरा ते वीस टक्के महिलांनाच याचा लाभ होईल असे दिसते. हा महिलांचा अपमान आहे. त्यामुळे ही कसली लेक लाडकी योजना असे वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान विधानसभा निवडणुकीत जनतेने या सरकारला डोळा मारण्याचा निर्णय घेतला आहे. अडीच वर्षे सरकारने केवळ जनतेची फसवणूक केली आहे. केवळ योजनांचा पाऊस पडला आहे. पण सरकारकडे पैसे नाहीत. यातून काही फारसे होईल, असे वाटत नाही असेही ते म्हणाले.