Kiran Mane | NEET Exam : वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’चा वाद दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालला आहे. ‘नीट’बाबत विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले असून विद्यार्थ्यांनी देशाच्या विविध भागात निदर्शने केली.
आधी पेपरफुटी आणि त्यानंतर अचानक रद्द केलेली पीजी परीक्षा, यामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गातून मोठा संताप व्यक्त केला जातोय. आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी अश्या अनेक राजकीय नेत्यांनी या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
मात्र, अश्यातच आता मराठी अभिनेते किरण माने यांनी देखील या सोशल मीडियावर पोस्ट करत केंद्र सरकावर हल्ला चढवला आहे. ‘NEET परीक्षेमधल्या घोटाळ्याला या कोडग्यांनी भिकसुद्धा घातली नसती. उडवुन लावलं असतं. पण केंद्रात कुबड्या घेऊन सत्तेत आलेत. न ऐकून सांगतायत कुणाला?’ असं किरण माने म्हणाले आहेत.
काय आहे? किरण माने यांची फेसबुक पोस्ट, वाचा….
‘केंद्रात कशीबशी सत्ता आली म्हणून कितीही टणाटणा उड्या मारूद्यात… या टग्यांना महाराष्ट्रात ठाकरे, पवारांची आणि देशात राहुल गांधींची जबरदस्त दहशत बसलेली आहे. इलेक्शन कमिशनपास्नं इव्हीएमपर्यन्त सगळे हाताशी घेऊनही जनतेनं लाथ घातल्यामुळे या हुकूमशहांचा माज ठेचला गेलाय.
एरवी, मणिपूर धिंड आणि कुस्तीगीर महिला लैंगिक शोषणासारख्या गंभीर मुद्यांकडे माजोरडेपणानं डोळेझाक करणारे हे दगडाच्या काळजाचे लोक… NEET परीक्षेमधल्या घोटाळ्याला या कोडग्यांनी भिकसुद्धा घातली नसती. उडवुन लावलं असतं. पण केंद्रात कुबड्या घेऊन सत्तेत आलेत. न ऐकून सांगतायत कुणाला??
इकडे आदित्य ठाकरेंनी ‘ॲॅंटी पेपर लीक कायदा आणून सीईटी आयुक्तांवर कारवाई करावी’ असा इशारा देणारी दणदणीत प्रेस काॅन्फरन्स घेतली… तिकडे राहुल गांधींनीही असं रान पेटवलं… लगेच अनाजीपंतांपास्नं रंगाबिल्लापर्यंत सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली !
आदित्य ठाकरेंच्या आग्रही मागणीपुढे केंद्रसरकारला नाक घासावं लागलं. ‘ॲॅंटी पेपर लीक’ कायद्याला शेवटी मंजुरी द्यावीच लागली. आता पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. डायरेक्टर जनरल सुबोधकुमारलाही हाकलावं लागलं. राहुल गांधींनी केलेल्या गंभीर आरोपांपुढे झुकून युजीसी नेटची आणि NEET ची सीबीआय चौकशीही केली जाणार आहे. पण… एवढंच पुरेसं आहे का?
विद्यार्थ्यांचं आत्तापर्यंत झालेलं नुकसान कोण भरुन देणार??? या परीक्षा रद्द करून तरूण पोरापोरींच्या करीयरशी जीवघेणा खेळ खेळला जातोय. मागच्या दहा वर्षांत जवळजवळ पन्नास पेपर लीक झालेत. कितीतरी हुशार, प्रतिभावान पोरापोरींचे आयुष्य उद्धवस्त झालंय. काहींनी आत्महत्या केल्यात. काहींनी गुणवत्तेला मुरड घालून कमी दर्जाच्या नोकर्या स्विकारल्यात. याचा जाब सरकारला हडसून-खडसुन विचारायला हवा.
या देशात शिक्षण व्यवस्थेचा पुर्णपणे सत्यानाश झालेला आहे. सत्ताधार्यांना ‘हिंदु-मुस्लीम, मराठा-ओबीसी, दलित-सवर्ण, मंदिर-मस्जीद’ यापलीकडे काहीही दिसत नाहीये. देश चालवणे म्हणजे फक्त मंदिर बांधणे नाही ! जमत नसेल तर सरळ राजीनामा देऊन हिमालयात ध्यान करायला जा. ‘काबिल’ माणूस बसवा खुर्चीवर.’ या आशयाची किरण माने यांनी केली आहे.