काटेवाडी/भवानीनगर – बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अटीतटीच्या लढतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी बाजी मारत विजय मिळवला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला.
बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणुक जाहीर झाल्यापासून खासदार सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्यामध्ये सरळ लढत निर्माण झाल्याने या लोकसभेच्या लढतीसाठी संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. बारामती लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक जाहीर झाल्यापासून खऱ्या अर्थाने या मतदारसंघातील नागरिकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली होती.
सर्वसाधारण जनता ही तुतारी च्या पाठीमागे उभे राहिले तर नेतेमंडळी हे घड्याळाच्या पाठीमागे उभा राहिले होते. परंतु शरद पवार यांच्या विचारांचा व त्यांनी आजपर्यंत केलेल्या राजकीय प्रवासाचा विचार करून बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पसंती देत भरघोस असे मतदान केल्याने आज सुप्रिया सुळे यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला. या विजयामुळे काटेवाडी, कण्हेरी, इंदापूर तालुक्यातील भवानीनगर, सणसर या परिसरामध्ये गुलाल उधळून व तोफांची सलामी देऊन हा विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.
शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी तसेच आमदार रोहित पवार, बारामती ॲग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, सुनंदा पवार, तसेच कुटुंबातील इतरही सदस्यांनी बारामती लोकसभा मतदार संघामध्ये घरोघरी जाऊन खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार केल्याने तसेच सर्वसामान्य कार्यकर्ते व नागरिकांनी खऱ्या अर्थाने ही निवडणूक हातामध्ये घेतल्याने आजचा हा विजय केवळ सर्व कार्यकर्त्यांचा व जनतेचा असल्याचे मत शरयू फाउंडेशनचे अध्यक्षा शर्मिला पवार यांनी व्यक्त केले.
या विजयावेळी शर्मिला पवार यांच्या समवेत महादेव कचरे, शिवसेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सतीश काटे, एडवोकेट रोहित काटे, छत्रपती साखर कारखान्याचे माजी संचालक तात्यासाहेब देवकाते, सुजित नरूटे, रवींद्र घुले, प्रकाश गरदडे, रामभाऊ ठोंबरे, राजेंद्र कढणे, इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते व सर्व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.