जामखेड – निरोप समारंभ हा दिवस प्रत्येक शासकीय नोकरदाराचा भावनिक क्षण असतो. हा दिवस खास व्हावा, सदैव आठवणीत राहावा अशी प्रत्येकाची इच्छा देखील असते. असाच एक खास प्रसंग जामखेडमध्ये घडला. येथील तहसीलदार योगेश चंद्रे यांची प्रशासकीय बदली नंदुरबार येथे झाली असून जामखेडला नुतन तहसीलदार म्हणून गणेश माळी यांची नियुक्ती झाली आहे.
आज झालेल्या निरोप व नुतन तहसीलदार गणेश माळी यांचा स्वागत समारंभात गावकऱ्यांनी तहसीलदार योगेश चंद्रे ( Tehsildar Yogesh Chandre) यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह अनेकांचे डोळे पाणावले होते. असा प्रसंग क्वचितच एखाद्या अधिकार्याच्या बदलीनंतर पाहायला मिळातो.
तहसीलदार योगेश चंद्रे यांची कोपरगाव येथून जामखेडला बदली झाल्याबरोबरच त्यांनी महसूल विभागात अमुल्य बदल घडविले. जिल्ह्यात सर्वाधिक पाणंद रस्ते तहसीलदार योगेश चंद्रे यांनी जामखेड तालुक्यात शेतकऱ्यांसाठी उघडुन देण्याचे काम केले. तालुक्यातील अवैध गौण खनिज व वाळू उपसा यास चाप बसवला. त्यामुळे अवैध वाळू उपसा तसेच गौण खनिज उत्खनन पूर्णपणे थांबले.
याबरोबरच विविध विभागातील अनेक कामचुकार कर्मचार्यांना वठणीवर आणण्याबरोबरच राज्य शासनाचे अनेकविध पथदर्शी कार्यक्रम तालुक्यात चंद्रे यांनी यशस्वीपणे राबविले आहेत. त्यांनी तलाठी ते तहसीलदारपर्यंतच्या प्रवासात सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका बजावली. एवढेच नव्हेतर महसूल अधिकाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लावला.
प्रशासनात पारदर्शी कारभारामुळे त्यांनी जनतेच्या मनात चांगले स्थान निर्माण केले. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगेश चंद्रे यांना कार्यालयातून निरोप दिला. शुभेच्छा स्वीकारताना चंद्रे भावनिक झाले. कार्यालयाबाहेर पडून वाहनात बसताना भावना अनावर होऊन त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यानंतर उपस्थितांचे डोळे पाणावले आणि तहसीलदार कार्यालयात भावनिक वातावरण तयार झाले.
समारंभ कार्यक्रमावेळी प्रांताधिकारी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक महेश पाटील, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, नायब तहसीलदार मनोज भोसेकर, यांच्यासह मंडळाधिकारी, तलाठी, महसूल विभागचे कर्मचारी यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नुतन तहसीलदार गणेश माळी यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले की, येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार योगेश चंद्रे यांनी ज्या ठिकाणी काम केले त्या प्रत्येक भागात सेवाभावी वृत्तीने काम केले त्यामुळे प्रशासकीय सेवेत असूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांची काम करण्याची पद्धत आदर्श घेण्यासारखी आहे.
तहसीलदार गणेश माळी म्हणाले, ‘‘कुठल्याही पदावर असलो तरी नागरिकांना न्याय देण्याची तहसीलदार योगेश चंद्रे यांचा गुण मी निश्चितपणे आत्मसात करेन.’’ कार्यक्रमात विविध महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या. नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांनी सूत्रसंचालन केले. मंडल अधिकारी नंदकुमार गव्हाणे यांनी आभार मानले.