नागठाणे, (प्रतिनिधी) – जून महिन्यात सर्व अनुदानित विनाअनुदानित खाजगी, सर्व माध्यमांच्या शाळा, कॉलेज, महाविद्यालये सुरू झाली आहेत. या शाळांमध्ये असलेल्या विद्यार्थी वाहतुकीच्या वाहनांची तपासणी बोरगाव परिसरात करण्यात आली.
सध्या ग्रामीण भागातही विद्यार्थी वाहतुकीसाठी स्कूल बसेसचे प्रमाण वाढले आहे. त्या बसेस व इतर वाहनांची बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत तपासणी चालू आहे.
जी वाहने नियमबाह्य पद्धतीने तसेच विद्यार्थी सुरक्षेचे तंतोतंत पालन करत नसतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश अधिक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.
आदेशान्वये उपविभागीय अधिकारी राजीव नवले, सपोनि रविंद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव पोलीस ठाण्याचे वाहतुक कर्मचारी ए. एस. आय सुधीर भोसले ,कॉ. उत्तम गायकवाड यांनी बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही मोहीम राबवली.
विविध शिक्षण संस्थांमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थी यांची वाहतुक करणाऱ्या वाहन धारकांनी सुरक्षेविषयी नियमांचे पालन करावे. तसेच वाहनांची कागदपत्रे अद्यावत ठेऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करून कटू कारवाई टाळावी, असे आवाहन सपोनि तेलतुंबडे यांनी केले आहे.