Paris Olympics 2024 : – पॅरिस ऑलिंपिकसाठी हॉकी इंडियाने १६ सदस्यीय भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा केली. संघाची कमान हरमनप्रीत सिंगकडे सोपवण्यात आली आहे, तर मिडफिल्डर हार्दिक सिंगला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. हरमनप्रीतचे हे तिसरे ऑलिम्पिक असेल. अनुभवी खेळाडूंसोबतच ५ युवा खेळाडूंनाही संघात स्थान देण्यात आले आहे, जे ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार आहेत.
ब गटातील भारताचा सामना २७ जुलैला न्यूझीलंडशी होणार आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ २७ जुलै रोजी न्यूझीलंडविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. भारतीय संघाला ब गटात स्थान देण्यात आले आहे. भारत बेल्जियम, अर्जेंटिना, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंडसह ब गटात आहे. तर अ गटात नेदरलँड्स, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.
गटागटात एकदाच संघ एकमेकांशी भिडतील. प्रत्येक पूलमधील टॉप-४ संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. पॅरिस ऑलिम्पिक हॉकी पदक फेरीचे सामने ८ ऑगस्ट रोजी नियोजित करण्यात आले आहेत.
भारतीय हॉकी संघाने चमकदार कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये जर्मनीचा ५-४ अशा फरकाने पराभव करून कांस्यपदक जिंकले. हा सामना जिंकून भारताने तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये हॉकीमध्ये पदक जिंकले. याआधी भारताने वासुदेवन भास्करन यांच्या नेतृत्वाखाली १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. पॅरिस ऑलिम्पिकच्या संघात भारतासाठी कांस्यपदक जिंकणारे १० खेळाडू आहेत. यामध्ये श्रीजेश, हरमनप्रीत सिंग, अमित रोहितदास, मनप्रीत सिंग यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.
श्रीजेश आणि मनप्रीतचे चौथे ऑलिम्पिक
या संघात अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि मिडफिल्डर मनप्रीत सिंग यांचाही समावेश आहे, जे दोघेही चौथे ऑलिंपिक खेळणार आहेत. डिफेन्स लाइनमध्ये हरमनप्रीत सिंग, जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, सुमित आणि संजय यांचा समावेश आहे, तर मिडफिल्डमध्ये राजकुमार पाल, शमशेर सिंग, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग आणि विवेक सागर प्रसाद यांचे योगदान दिसेल. फॉरवर्ड लाइनमध्ये अभिषेक, सुखजित सिंग, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंग आणि गुरजंत सिंग सारखे उत्कृष्ट खेळाडू आहेत.
T20 World Cup 2024 (IND vs ENG Semifinal-2) : रनमशीन ‘विराट कोहली’ पुन्हा ठरला अपयशी…
याशिवाय गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठक, मिडफिल्डर नीलकांत शर्मा आणि बचावपटू जुगराज सिंग यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जर्मनप्रीत सिंग, संजय, राज कुमार पाल, अभिषेक आणि सुखजीत सिंग हे पाच खेळाडू पॅरिसमध्ये ऑलिंपिक पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत.
भारतीय पुरुष हॉकी संघ – गोलरक्षक- पी.आर. श्रीजेश. डिफेंडर- जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, सुमित, संजय. मिडफिल्डर- राजकुमार पाल, शमशेर सिंग, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद. फॉरवर्ड- अभिषेक, सुखजित सिंग, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंग, गुरजंत सिंग. राखीव खेळाडू – नीलकांत शर्मा, जुगराज सिंग, कृष्ण बहादूर पाठक