नवी दिल्ली : भारत अवकाशात सतत नवा इतिहास रचत आहे. चांद्रयान आणि आदित्य मोहिमांच्या यशानंतर इस्रोचे पुढचे मिशन गगनयात्री आहे. भारत 2025 पर्यंत आपले गगनयात्री म्हणजेच अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्याच्या तयारीत आहे. इस्रो आणि नासा यांचे हे संयुक्त अभियान असेल. या अंतर्गत एक भारतीय गगनयात्री आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचेल, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी दिली.
एका माध्यम समूहाशी सविस्तर मुलाखतीमध्ये सोमनाथ यांनी अनेक विषयांना स्पर्श केला. सोमनाथ म्हणाले की, भारत चंद्रावर असलेल्या शिवशक्ती बिंदूवरून चंद्राच्या मातीचे काही नमुने देखील आणेल. तसेच गगनयात्री मोहीम ही इस्रो आणि अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासा यांची संयुक्त मोहीम आहे. त्याची घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी केली होती.
भारतीय अंतराळवीराची निवड कशी होणार?
डाॅ. सोमनाथ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिवेंद्रममध्ये ज्या चार भारतीय अंतराळवीरांची देशाला ओळख करून दिली होती, त्यापैकी दोन जणांची निवड करण्यात आली आहे. या दोघांनाही मिशन ट्रेनिंगसाठी अमेरिकेला पाठवले जाईल. येथे ते तीन महिने घालवतील. त्यातील एकाची भारतातून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाण्यासाठी निवड होईल. हे दोन अंतराळवीर ग्राउंड बेस्ड मिशनवर प्रशिक्षणासाठी अमेरिकेला जाणार आहेत. यापूर्वी राकेश शर्मा आणि रवीश मल्होत्रा यांची संरक्षण मंत्रालयाने भारताच्या वतीने अंतराळवीर म्हणून निवड केली होती. त्याचप्रमाणे यावेळीही भारत कोणता अंतराळवीर स्पेस स्टेशनवर जाणार हे ठरवेल.एस. सोमनाथ म्हणाले, अमेरिकेतील बहुतांश अंतराळ मोहिमा केवळ खासगी एजन्सींच्या माध्यमातूनच पार पाडल्या जातात. नासाही या एजन्सीमार्फत लोकांना अंतराळ स्थानकावर पाठवते. या एजन्सींना यासाठी पैसे दिले जातात. आम्हीही या मोहिमेत सहभागी होत एजन्सीला पैसे देत आहोत.
गगनयात्री हे वैज्ञानिक मिशन असेल का?
भारताचे अंतराळवीर पर्यटकांप्रमाणे गगनयात्री मोहिमेवर जातील की ते वैज्ञानिक मिशन असेल? यावर एस. सोमनाथ म्हणाले, हे केवळ एक वैज्ञानिक मिशन असेल. त्यामुळे त्याचे प्रशिक्षणही खूप महत्त्वाचे आहे. या मोहिमेदरम्यान पाच वैज्ञानिक प्रयोगही केले जाणार आहेत. हे अंतराळवीर इस्रो आणि अमेरिकेच्या प्रयोगांमध्ये सहभागी होतील. शून्य गुरुत्वाकर्षणात कसे प्रयोग केले जातात याची सर्व माहिती आपल्याला गगनयात्री मिशनमधून मिळेल.