भंडारा : भंडाऱ्यातील अपेक्षा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सोमवारी (ता. 24 जून) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार भोंडेकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे पूर्व विदर्भात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे आणि पक्ष संघटन येणारा काळात मजबूत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी व्यक्त केला.
राज्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतरावेळी नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साथ दिली होती. अपक्ष आमदार असले तरी नरेंद्र भोंडेकर हाडाचे शिवसैनिक आहेत. 2019 मध्ये शिवसेनेने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नरेंद्र भोंडेकर हे सुरुवातीपासून शिवसैनिक होते. त्यांच्याकडे जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी होती. बाळासाहेबांच्या विचारांना मानणारे भोंडेकर यांनी आज शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश केला. शिवसेना कधी शक्ती प्रदर्शन करत नाही. वर्षाचे 365 दिवस शिवसेना कार्य करत असते, असे मुख्यमंत्री म्हणाले. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे त्यांनी सांगितले.