IND-W Vs SA-W One-Off Test, Day 2 : भारतीय फलंदाजांनंतर आता भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला अडचणीत आणले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने चार विकेट गमावून 236 धावसंख्येपर्यत मजल मारली आहे. हा संघ अजूनही भारतापेक्षा 367 धावांनी मागे आहे. भारताने पहिला डाव सहा बाद 603 धावसंख्येवर घोषित केला आहे. महिला कसोटीतील एका डावातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताकडून फलंदाजीत शेफाली वर्माने 205 आणि स्मृती मानधना हिने 149 धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मॅरिझान कॅप 69 धावांवर तर नदिन डी क्लर्क 27 धावांवर नाबाद माघारी परतल्या.
असा होता दुसऱ्या दिवसाचा खेळ…
भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी 4 बाद 525 धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि 6 बाद 603 वर डाव घोषित केला. यादरम्यान, कर्णधार हरमनप्रीत कौर (69) आणि ऋचा घोष (86) यांनी शानदार अर्धशतके झळकावली. दोघीही बाद झाल्यानंतर भारतानं डाव घोषित केला. दक्षिण आफ्रिकेकडून डेल्मी टकरने सर्वाधिक 2 बळी घेतले.
It’s Stumps on Day 2 of the #INDvSA Test in Chennai!
South Africa move to 236/4, trailing #TeamIndia by 367 runs.
3⃣ wickets for @SnehRana15
1⃣ wicket for @Deepti_Sharma06We will be back for Day 3 action tomorrow! ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/4EU1Kp7wJe @IDFCFIRSTBank pic.twitter.com/LJg2Qjk9oB
— BCCI Women (@BCCIWomen) June 29, 2024
त्यानंतर, पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात सरासरीने झाली. संघाला पहिला झटका 33 धावसंख्येवर बसला. कर्णधार लॉरा वोल्वार्डने 36 चेंडूत 20 धावांची खेळी खेळली. स्नेहा राणाने तिला बोल्ड केले. यानंतर 96 धावसंख्येवर एनेके बॉशच्या रूपानं आफ्रिकेला दुसरा व मोठा धक्का बसला. बाॅशने 73 चेंडूत 39 धावांची खेळी केली. स्नेहा राणानेच तिला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
त्यानंतर सुने लुसच्या रूपाने 189 धावसंख्येवर संघाला तिसरा धक्का बसला. तिने 65 धावांची खेळी खेळली. भारताला दीप्ती शर्माने तिसरे यश मिळवून दिले. यानंतर 198 धावसंख्येवर डेल्मी टकरनं आपली विकेट गमावली. स्नेहाने तिला बाद करत आपली तिसरी विकेट घेतली. डेल्मी टकरला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर मॅरिझान कॅप आणि नदिन डी क्लर्क यांनी डाव सावरला व विकेटची आणखी पडझड न होऊ देता दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा नाबाद माघारी परतल्या. भारताकडून स्नेह राणाने सर्वाधिक 3 तर दिप्ती शर्मानं एक विकेट घेतली.