IND-W Vs SA-W One-Off Test Match Report : भारतीय महिला क्रिकेट संघाने एकमेव अशा चेन्नई कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 10 गडी राखून पराभव केला. अशा प्रकारे भारताने एका सामन्याची कसोटी मालिका 1-0 ने जिंकली. भारताला दुसऱ्या डावात विजयासाठी 37 धावा करायच्या होत्या. भारताकडून सलामीवीर शेफाली वर्मा 24 धावा करून तर शुभा सतीश 13 धावा करून नाबाद परतली.
तत्पूर्वी, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 6 बाद 603 धावा करून पहिला डाव घोषित केला. भारताकडून शेफाली वर्माने 23 चौकार अन् 8 षटकारासह सर्वाधिक 205 धावा केल्या. तर स्मृती मानधना हिने 26 चौकार अन् 1 षटकारासह 149 धावांची अप्रतिम खेळी केली. याव्यतिरिक्त जेमिमाह रॉड्रिग्जने 55 तर हरमनप्रीत कौरने 69 धावांचे योगदान दिले. यष्टीरक्षक रिचा घोषनेही 86 धावांची चांगली खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात डेल्मी टकरने सर्वाधिक 2 बळी घेतले. याशिवाय एनडीनी डी क्लर्क, तुमी सेखुखुने आणि नोल्कुकुलेको मलाबा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
भारताच्या 603 धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 266 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेकडून सुने लुसने सर्वाधिक 65 धावा केल्या. याशिवाय एंके बॉश आणि नेदिनी डी क्लर्कने प्रत्येकी 39-39 धावांचे योगदान दिले. भारताकडून स्नेह राणाने सर्वाधिक विकेट घेतल्या. स्नेह राणाने 8 खेळाडूंना बाद केले. तर दीप्ती शर्माने 2 बळी घेतले.
यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑनसाठी भाग पाडले. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात चांगली झुंज दाखवली आणि सर्वबाद 373 धावसंख्येपर्यत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेसाठी लॉरा वूल्व्हर्ट आणि सुने लुस यांनी शतकाचा टप्पा ओलांडला. लॉरा वूल्व्हर्टने 122 तर सुने लुसने 109 धावांची खेळी केली. याशिवाय नेदिनी डी क्लर्कने 61 धावांची चांगली खेळी केली.
IND-W Vs SA-W One-Off Test, Day 3 : स्नेह राणाचे तब्बल 8 बळी, फॉलोऑननंतर दक्षिण आफ्रिका सुस्थितीत…
या तिघीं फलंदाजाशिवाय इतर फलंदाजांनी मात्र साफ निराशा केल्याने आफ्रिकेचा पराभव निश्चित झाला होता. आफ्रिकेचा दुसरा डाव 373 धावसंख्येवर आटोपल्याने भारतासमोर केवळ 37 धावाचे लक्ष्य होते आणि हे लक्ष्य भारताने एकही गडी न गमावता 9.2 षटकातच पूर्ण करत विजयावर शिक्कामोर्तब केलं.
भारताकडून दुसऱ्या डावात गोलंदाजीत स्नेह राणा, दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. याशिवाय पूजा वस्त्राकर, शेफाली वर्मा आणि हमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. दोन्ही डावात दहा विकेट्स घेणारी भारताची गोलंदाज स्नेह राणा प्लेअर ओफ मॅचची मानकरी ठरली.