Smriti Mandhana Century : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात स्मृती मंधानाने झंझावाती कामगिरी करत शतक झळकावले. मंधानाने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. मंधानाने बुधवारी ऐतिहासिक खेळी खेळली. शतकाच्या जोरावर तिने अनेक विक्रम मोडीत काढले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यातही तिने 117 धावांची इनिंग खेळली होती. आता तिने मालिकेतील सलग दुसरे शतक झळकावून इतिहास रचला आहे. मंधानाने दुसऱ्या सामन्यात 120 चेंडूत 18 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 136 धावांची खेळी केली आहे. तसेच मंधाना व्यतिरिक्त कर्णधार हरमनप्रीतने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. हरमनप्रीत 88 चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 103 धावा केल्यानंतर नाबाद राहिली.
मंधानाने केला खास विक्रम
वनडेमध्ये सलग दोन शतके झळकावणारी मंधाना ही पहिली भारतीय महिला खेळाडू तर आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये एकूण 10वी महिला खेळाडू ठरली. मंधानाच्या आधी एमी सॅटरथवेट, जिल केनरे, डेबोराह हॉकी, केएल रॉन्टन, मेग लॅनिंग, टॅमी ब्युमॉन्ट, ॲलिसा हिली, नेट शेव्हर ब्रंट आणि एल वोल्वार्ड यांनी ही कामगिरी केली आहे.
IND vs SA 2nd ODI : स्मृती मंधानाचे सलग दुसरे शतक, टीम इंडियाचा आफ्रिकेसमोर धावांचा डोंगर…
या बाबतीत साधली मितालीशी बरोबरी…
मंधानाचे वनडे कारकिर्दीतील हे सातवे शतक होते. तिने दिग्गज मिताली राजच्या वनडेतील सात शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. वनडेमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारी भारतीय खेळाडू म्हणून ती आता मितालीसह अव्वल स्थानावर आहे. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, मंधानाने 84 एकदिवसीय डावात ही सात शतके झळकावली आहेत. तर मितालीला यासाठी 211 वनडे डाव खेळावे लागले.
ICC ODI Rankings : स्मृती मंधानाने आयसीसी क्रमवारीत घेतली मोठी झेप…
*वनडेमध्ये सर्वाधिक शतके (भारतीय महिला खेळाडू)*
स्मृती मानधना 7 शतके
मिताली राज 7 शतके
हरमनप्रीत कौर 6 शतके
पूनम राऊत 3 शतके
असाही एक अनोखा विक्रम…
मंधानाची सातही शतके सलामीला आली आहेत. याआधी कोणत्याही भारतीय सलामीवीराने दोन शतकांपेक्षा जास्त शतके झळकावली नव्हती. मंधानाची 136 धावांची खेळी ही भारतीय महिला खेळाडूची भारतीय भूमीवर वनडेतील सर्वोच्च धावसंख्या आहे.