Live Cricket Score (T20 World Cup 2024, Super 8, IND vs AUS) : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुपर एटमधील गट 1 मधील महत्त्वाचा सामना आहे. भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित आहे आणि हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करेल, तर मागील सामना गमावलेल्या ऑस्ट्रेलियासाठी हा सामना ‘करो या मरो’ असा आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माच्या 92 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 5 बाद 205 धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताने दमदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या विश्वचषकात भारताने 200 धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Innings Break!
Captain Rohit Sharma led from the front as #TeamIndia post a total of 205/5 🙌
Over to our bowlers now! 👍
Scorecard ▶️ https://t.co/L78hMho6Te#T20WorldCup | #AUSvIND pic.twitter.com/djk7WWCvI6
— BCCI (@BCCI) June 24, 2024
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि जोश हेझलवूडने विराट कोहलीला खाते न उघडताच बाद करून कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. मात्र, रोहित आज वेगळ्याच रंगात दिसला आणि त्याने तुफानी फलंदाजी करत कांगारू संघाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या काळात रोहितने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
डावातील तिसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या स्टार्कच्या षटकात रोहितने 29 धावा केल्या आणि जोरदार फलंदाजी सुरू ठेवली. रोहित एकेकाळी शतकाकडे वाटचाल करत होता, पण स्टार्कने त्याचा डाव संपवला. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने शानदार फॉर्मात असलेला कर्णधार रोहित शर्माला बाद करून भारताला तिसरा धक्का दिला. रोहित या सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता आणि शतकाकडे वाटचाल करत होता, पण स्टार्कने गोलंदाजी करत भारतीय कर्णधाराचा डाव संपवला. रोहित 41 चेंडूत 7 चौकार अन् 8 षटकारासह 92 धावा करून बाद झाला. रोहित भलेही शतक झळकावण्यापासून चुकला असेल, पण टी-20 विश्वचषकातील ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे.
रोहित बाद झाल्यानंतर भारताचा डाव थोडा मंदावला असला तरी सूर्यकुमार यादव (16 चेंडूत 31), शिवम दुबे (22 चेंडूत 28 धावा) आणि हार्दिक पंड्या (17 चेंडूत 27 नाबाद धावा) यांनी काही चांगले फटके खेळले आणि संघाची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. त्याचवेळी विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि स्पर्धेत दुसऱ्यांदा खातेही न उघडता माघारी परतला. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने 14 चेंडूत 15 धावांची खेळी केली. तर रविंद्र जडेजा 5 चेंडूत 9 धावांवर नाबाद माघारी परतला.
ऑस्ट्रेलियासाठी जोश हेझलवूडने अतिशय किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकात केवळ 14 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. तर मिचेल स्टार्क आणि मार्कस स्टॉइनिस यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. स्टार्कने 4 षटकात 45 तर स्टाइनिसने 4 षटकात 56 धावा दिल्या. पॅट कमिन्स आणि अॅडम झम्पा यांना तर एकही गडी बाद करता आला नाही. कमिन्सने 4 षटकात 48 तर झम्पानं 4 षटकात 41 धावा दिल्या.