मंचर, (प्रतिनिधी) – मंचर (ता.आंबेगाव) येथील नगरपंचायतीने घरपट्टीत वाढवलेले कर कमी होणार आहे, अशी माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी बुधवार, दि. १९ रोजी दिली.
घरपट्टीतील करवाढीची अंमलबजावणी अंमलबजावणी २०२४ पासून होणार होती. मात्र, वाढवलेल्या कराबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त करत या बाबत नगरपंचायत प्रशासनाकडे तक्रारी अर्जही केले होते. यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष व मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे,
शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा समन्वयक राजाराम बाणखेले, मंचर शहराध्यक्ष विकास जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक दत्तात्रय खानदेशे,विनय भालेराव ,विनय घोडके आदी मान्यवर मंचर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. पूर्वी मंचर ग्रामपंचायत असताना २०१६ साली ग्रामपंचायतचे कर वाढवण्यात आले होते.
त्यानंतर ग्रामपंचायतीमार्फत २०२० मध्ये कर वाढवण्यात येणार होते. मात्र, त्यावेळी कोरोनाचे संकट असताना कर वाढवण्यात आला नाही व त्यानंतर मंचर ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले व नगरपंचायतीने कर वाढवले. त्यांनी कर वाढवणे अपेक्षित होते.
मात्र, ग्रामपंचायत कर व नगरपंचायतीच्या कर यात सुमारे ७५ ते ८० टक्क्यांनी कर वाढवले असून वाढवलेल्या कराबाबत मंचरकरांनी नाराजी व्यक्त करत कर कमी करावे याबाबत तक्रारी अर्ज नगरपंचायत प्रशासक यांच्याकडे दिले होते.
नगरपंचायत प्रशासनाने बांधकाम कर, वृक्षकर, शिक्षणकर, व्यवसायिकांसाठी रोजगारहमी कर, अग्निशामक कर, उपयोगिता कर, स्वच्छता कर, हे कर लागू केले असून सर्व कर मिळून जवळपास ३६०० रूपये होत आहे.
याबाबत जवळपास हजार ते बाराशे नागरिकांनी तक्रारी दाखल केल्यानंतर तसेच मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी यांनी मंचर नगरपंचायत मुख्याधिकारी गोविंद जाधव व पुणे येथील टाऊन प्लॅनिंगचे अधिकारी यांची भेट घेऊन यामध्ये आकारण्यात आलेले कर कोठे कमी करता येतील याबाबत एक प्लॅन सादर करून त्यांना कर कमी करण्याबाबत पाठपुरावा केला.
त्यांच्या या मागणीला अधिकाऱ्यांनी ही सकारात्मक प्रतिसाद देत कर कमी करण्याचे आश्वासन दिले असल्याचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी सांगितले.
तक्रारींची उद्या सुनावणी
नगरपंचायतीने आकारण्यात आलेले स्वच्छता कर, वृक्ष कर, शिक्षण कर हे कर कमी करून त्याची रक्कम कमी होउन २,९०० रुपये कर येऊ शकतो. तसेच यात राजकीय नेत्यांनी लक्ष घातल्यास व पाठपुरावा केल्यास अजूनही थोडाफार कर कमी होऊ शकतो, असेही दत्ता गांजाळे म्हणाले.
शुक्रवार, दि. २१ रोजी मंचर नगरपंचायत येथे टाउन प्लॅनिंगचे अधिकारी येणार असून ज्या नागरिकांनी कर वाढीबाबत तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवानही दत्ता गांजाळे यांनी केले आहे.