Pregnancy | Surrogate mothers | 6 months leave – सरोगसीद्वारे आई होणाऱ्या महिलांसाठी एक चांगली बातमी आहे. सरकारी कर्मचारी असलेल्या महिला सरोगसीद्वारे आई झाल्या तर त्यांनाही सहा महिन्यांची मातृत्व रजा मिळणार आहे. यासंदर्भातील ५० वर्ष जुन्या नियमात सरकारने दुरूस्ती केली आहे.
सरोगसीचा अर्थ गर्भाशय भाड्याने घेऊन मुल जन्माला घालणे. केंद्रीय नागरि सेवा नियमावली, १९७२ मध्ये केलेल्या दुरूस्तीनुसार सरोगसीद्वारे आई झालेली महिला बाळाचे संगोपन करण्यासाठी सहा महिन्यांची रजा घेऊ शकते.
एवढेच नाही तर त्या बाळाच्या पित्यालाही पंधरा दिवसांची रजा मिळू शकते. जन्मलेल्या मुलाच्या देखभालीसाठी त्याच्या माता- पित्यांना सुटी आवश्यक असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
सरकारच्या म्हणण्यानुसार सरोगसीने आई झालेल्या महिलेची मातृत्व रजा आता १८० दिवसांची असेल. सरोगसीच्या माध्यमातून आई होणाऱ्या महिलेला रजा देण्याच्या संदर्भात आतापर्यंत नियमांत कोणती तरतूद नव्हती. ती आता करण्यात आली आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या नियमांनुसार महिला सरकारी कर्मचारी आणि पुरूष सरकारी कर्मचारी यांना त्यांच्या पूर्ण सेवाकाळात मुलांच्या देखभालीसाठी जास्तीत जास्त ७३० दिवसांची रजा मिळू शकते. त्यात दोन मुलांची देखभाल, त्यांचे आजारपण अथवा शिक्षण आदींसाठीच्या रजेचा अंतर्भाव आहे.