Sharad Pawar on Maharashtra budget | अर्थमंत्री अजित पवार यांनी 27 जून 2024 रोजी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा समावेश त्यांनी केला होता. मात्र विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर टीका करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या घोषणा करण्यात आल्याचे म्हंटले गेले. यातच आता शरद पवारांनी देखील अर्थसंकल्पावर भाष्य केले आहे. खिशात 70 रुपये मग 100 रुपये खर्च करणार कसे? अशी टीका शरद पवार यांनी अजित पवारांवर केली आहे.
“सर्व तरतुदी लोकांपर्यंत पोहोचायला कित्येक महिने लागतील. तरतूद कमी रकमेची करायची आणि प्रत्यक्षात सुचवायचं अधिक रक्कम दिली जाईल. म्हणजे जमा, महसुली तूट आणि लागणारी आवश्यकता या तीन गोष्टींचे आकडे पाहिले तर आवश्यकतेपेक्षा कितीतरी कमी निधीची उपलब्धता आहे. अर्थसंकल्पात ज्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत येण्याची तरतूद नाही अशा गोष्टी त्यात सांगण्यात आल्या आहेत. पूर्ण अर्थसंकल्प ३ महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक लक्षात ठेवून मांडला आहे,” असं शरद पवार म्हणाले. Sharad Pawar on Maharashtra budget |
एखाद्या गोष्टीला 100 रुपये खर्च असेल आणि माझ्या खिशात 70 रुपये असेल तर मग खर्च कसा करणार असा सवाल त्यांनी केला. वीजमाफी दिली, तर आज वीजमंडळाची स्थिती काय आहे? त्यांना होणारा तोटा भरून काढण्याची तरतूद झाली नाही, तर ते राबवलं जाणार का? याची शंका आहे. तीन महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मांडला गेला आहे. त्यामुळे काहीतरी भयंकर करतोय असे दाखवण्याचा हा प्रकार आहे, असेही शरद पवार म्हणाले.
मोदींनी सभा घेतलेल्या 14 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव
पुढे बोलताना शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीचा निकालावरही भाष्य केले. लोकसभा निवडणुकीत आम्ही 48 पैकी 31 जागा जिंकल्या. सरकारने आमचा धसका घेतला आहे. मोदींनी राज्यात 18 सभा घेतल्या. पण सभा घेतलेल्या 14 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. मोदींच्या कामावर जनता खुश नाही,” असे म्हणत शरद पवार यांनी मोदींवर निशाणा साधला.
आघाडी हाच आमचा चेहरा
संजय राऊत यांनी महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीत बिनचेहऱ्याने जाणे धोक्याचे ठरेल. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले होते. त्यावर आमची आघाडी हाच आमचा चेहरा आहे. एका व्यक्तीने नाही तर आघाडीतील सर्व नेते एकत्रित निर्णय घेत असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा:
असदुद्दीन ओवेसींच्या घरावर हल्ला प्रकरणी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गुन्हा दाखल