ICC T20I Rankings :- टी-20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीपूर्वी आयसीसीने नवीनतम क्रमवारी जाहीर केली आहे. टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू सूर्यकुमार यादवला टी-20 फलंदाजी क्रमवारीत एका स्थानाचे नुकसान झाले आहे. त्याने प्रथम क्रमांकाचा मुकुट गमावला आहे. तर कर्णधार रोहित शर्मानं मोठी झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू ट्रॅव्हिस हेड फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमलाही नुकसान झालं आहे.
आयसीसी टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत डिसेंबर 2023 पासून सूर्यकुमार यादव अव्वल स्थानावर विराजमान होता, परंतु आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत त्याची घसरण झाली आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतून ऑस्ट्रेलियाचा संघ सुपर 8 मधून बाहेर पडला असला तरी ट्रॅव्हिस हेडने मोठी झेप घेतली. तो टी-20 तील नंबर वन फलंदाज बनला आहे. ट्रॅव्हिस हेडने चार स्थानांची झेप घेताना सूर्यकुमार यादव, फिल सॉल्ट, बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांना मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे.
टी-20 च्या ताज्या क्रमवारीत हेड 844 गुणांसह अव्वल स्थानी तर भारताचा सूर्यकुमार यादव 842 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पहिला आणि दुसरा फलंदाज यांच्यात फक्त दोन रेटिंग गुणांचा फरक आहे. हा फरक सूर्या सहज भरून काढू शकतो पण यासाठी त्याला मोठी खेळी खेळावी लागणार आहे. टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल सातव्या क्रमांकावर कायम आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टी-20 क्रमवारीत 13 स्थानांची मोठी झेप घेतली आहे. तो 38 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहितला 527 रेटिंग मिळाले आहेत. त्याने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध 41 चेंडूत 92 धावांची स्फोटक खेळी खेळली होती त्याचा त्याला फायदा झाला. विराट कोहलीलाही क्रमवारीत तीन स्थानांचा फायदा झाला आहे. तो 47 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
टॉप-5 फलंदाज…
1. ट्रेव्हिस हेड – ऑस्ट्रेलिया – 844 गुण
2. सूर्यकुमार यादव -भारत – 842 गुण
3. फिल सॉल्ट – इंग्लंड – 816 गुण
4. बाबर आझम – पाकिस्तान – 755 गुण
5. मोहम्मद रिजवान – पाकिस्तान – 743 गुण
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिकची मोठी उडी…
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत श्रीलंकेचा हसरंगा 222 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी 2 स्थानांनी पुढे येत दुसऱ्या स्थानावर पोहोचला असून त्याचे 214 गुण आहेत. तर भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने 4 स्थानांची झेप घेत तो आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. हार्दिकचे 213 गुण आहेत. या यादीत हार्दिक वगळता अन्य कोणताही भारतीय खेळाडू टाॅप-10 मध्ये नाही.
गोलंदाजांच्या टॉप 10 मध्ये भारताचा एकमेव गोलंदाज
गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल राशिद 719 गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे तर अफगाणिस्तानचा दिग्गज फिरकीपटू राशिद खान याने 2 स्थानाची झेप घेतली आहे. तो 681 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा हा 674 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
गोलंदाजांच्या टॉप 10 मध्ये भारताचा एकमेव गोलंदाज अक्षर पटेल आहे. अक्षरचे 647 गुण असून तो आठव्या स्थानावर आहे. आधी तो नवव्या स्थानावर होता.