शिरूर/ जांबूत, (वार्ताहर)- जांबूत (ता. शिरूर) येथील इंदिरा आवास घरकुल घोटाळा प्रकरणी फसवणूक झाल्याने लाभार्थी उषा रणदिवे आणि विशाल रणदिवे यांनी शिरूर तहसील कार्यालयाच्या आवारात सोमवार (दि.२४) रोजी सुरु केलेले उपोषण मंगळवार (दि.२५ ) रोजी गटविकास अधिकारी महेश डोके यांचे लेखी आश्वासनानंतर अखेर मागे घेतले.
यावेळी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, शिवसेना नेते गणेश जामदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांकचे तालुका उपाध्यक्ष युवराज सोनार, विस्तार अधिकारी बी. आर. गावडे, घरकुल विभागाच्या स्नेहल माकर, रामलिंग महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, शुभम वाकचौरे आदी उपस्थित होते.
घरकुल लाभार्थी उषा रणदिवे यांच्या घरकुल घोटाळा प्रकरणात दोषी आढळून येणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरु असून पुढील दहा दिवसांत या प्रकरणातील दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल तसेच आपल्या कुटुंबातील इतर पात्र व्यक्तीच्या नावे रमाई घरकुल आवास योजनेतून तातडीने प्रस्ताव तयार करून त्यास मंजुरी देण्यात येईल, असे लेखी आश्वासन गटविकास अधिकारी महेश डोके यांनी रणदिवे यांना दिले आहे.
लेखी आश्वासनानंतर लाभार्थी रणदिवे यांनी उपोषणास तात्पुरती स्थगिती देत उपोषण मागे घेतले. घोटाळा प्रकरणी दोषींवर शासकीय निधीचे अपहार, घरकुल घोटाळा फसवणूक केलेचे कारणावरून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.