सातारा – अभिनेता सलमान खान सध्या चित्रिकरणासाठी महाबळेश्वरला मुक्कामी आहे. डीएचएफएल घोटाळ्यातील आरोपी आणि सध्या ईडीच्या कोठडीत असलेल्या वाधवानच्या बंगल्यात सलमानचा मुक्काम आहे. त्यामुळे सलमान नवीन वादात अडकला आहे. सलमानने हाच बंगला का निवडला, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, डीएचएफएल घोटाळा प्रकरणात हा बंगला ईडीने सील केला असताना सलमानसाठी तो कोणाच्या परवानगीने खुला करण्यात आला, कोणाच्या दबावामुळे तेथे पाणी आणि वीजपुरवठा सुरू करण्यात आला, याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी महाबळेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याकडे मागितली आहे. योग्य माहिती न मिळाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा मोरे यांनी दिला आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली सलमान खानची भेट ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी याच बंगल्यात शुक्रवारी सलमान खानची भेट घेतल्याचे समजते.महाबळेश्वर येथे आल्यानंतर सलमानने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावी व घरी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दाट धुक्यामुळे तो मुख्यमंत्र्यांच्या गावी पोहचू शकला नाही. तो मुख्यमंत्र्यांच्या गावी कशासाठी जात होता हेही समजले नाही. त्याच्यावरील गोळीबार प्रकरणानंतर त्याला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. पोलीस संरक्षणात व त्याच्या मोठ्या महागड्या दहा- बारा गाड्यांच्या ताफ्यात सलमान महाबळेश्वर येथे आला आहे.