शिवशंकर निरगुडे
हिंगोली : ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या गजरात संत नामदेव महाराजांच्या पालखीचे नरसी नामदेव(ता. हिंगोली) येथून बुधवारी (ता.२६) दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या पालखी सोहळ्यात शेकडो वारकरी सहभागी झाले असून गावात नगर प्रदक्षिणेनंतर पालखी नामदेव मंदिरात मुक्कामी थांबली आहे.
संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ नरसी येथून गत २९ वर्षांपासून पालखी सोहळा पंढरपूर यात्रेसाठी रवाना होते संत नामदेव महाराज संस्थानजवळ पूजा केल्यानंतर गावात नगर प्रदक्षिणा झाली. यावेळी टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर ‘रामकृष्ण हरी’चा गजर करीत पालखी गावातील मुख्य मार्गाने नगर प्रदक्षिणा करत निघाली. जागोजागी रांगोळी काढून पालखीचे स्वागत करण्यात आले.
नरसी येथील भाविक काशीनाथ उफाड यांच्या निवासस्थानी दिंडीचा पहिला मुक्काम व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. २७ जूनला सकाळी दिंडी चालक बळिराम सोळंके यांच्या नेतृत्वाखाली हि पालखी पंढरपूरकड़े प्रस्थान झाली आहे. या दिंडीत सुमारे ४०० वारकरी सहभागी आहेत. नरसी ते पंढरपूरदरम्यान एकूण १९ ठिकाणी या पालखीचे मुक्काम आहेत. या पालखी सोहळ्यात चार रिंगण होतात. पहिले रिंगण हिंगोली येथे रामलीला मैदानावर होते, दूसरे रिंगण परळी वैजनाथ, तिसरे रिंगण अंबेजोगाई तर चौथे रिंगण जऊळबन येथे रंगणार आहे.
हिंगोलीत आज पहिले रिंगण
आज वार गुरुवारी (ता. २७) सकाळी सवड येथे पालखीचे स्वागत होईल. तेथे थोरात कुटुंबीयाच्या वतीने वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था असेल. त्यानंतर पालखी हिंगोली शहरात दाखल होईल. रामलीला मैदानावर पहिले रिंगण होणार आहे. महाराजा अग्रेसन चौकात दुपारी पालखीचे स्वागत होईल. इंदिरा चौक, जुनी नगर परिषद इमारतीजवळून पालखी रामलीला मैदानात जाईल.
तेथे होणाऱ्या रिंगण सोहळ्याची नगर परिषदेतर्फे तयारी पूर्ण झाली आहे. हिंगोली शहरात पालखीचा मुक्काम असेल. शुक्रवारी (ता. २७) पालखी औंढा येथे मुक्कामी थांबेल. त्यानंतर बाराशिव, हट्टा परभणी, पोखर्णी, गंगाखेड, उकडगाव, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, बोरी सावरगाव, वडगाव रामा, मसा, दगड धानोरा, खांडवी, चिंचगाव टेकडी, लहुळ, आष्टी मार्गे पंढरपूरकडे रवाना होईल.