नवी दिल्ली : कॉंग्रेसने हिमाचल प्रदेशच्या देहरा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखु यांच्या पत्नी कमलेश ठाकुर यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे होशियार सिंह यांच्याशी त्यांची लढत होईल. कमलेश ठाकुर यांचे माहेर देहरा येथे असल्यामुळे येथे कॉंग्रेसचाच विजय होईल असा विश्वास सुखु यांनी व्यक्त केला आहे. कमलेश पहिल्यांदाच राजकारणाच्या मैदानात उतरल्या आहेत.
याखेरीज हिमाचलच्या अन्य दोन जागांच्या पोटनिवडणुकीसाठीही कॉंग्रेसने उमेदवार जाहीर केले आहेत. हमीरपूर येथून डॉ. पुष्पेंद्र वर्मा यांना तर नालागढ येथून हरदीप सिंग बावा यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर या तीन जागांवरील अपक्षांनी राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक घ्यावी लागते आहे. त्या निवडणुकीनंतर कॉंग्रेसचे सहा आमदारांचे सदस्यत्व गेले होते तर तीन अपक्षांनी राजीनामा दिला होता. आता हे तिघे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत.