आरिफ शेख
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी या वर्षी निवडणुका आहेत. चीनवर कोण जास्त टीका करतो, यावर डोनाल्ड ट्रम्प आणि बायडेन यांच्यात स्पर्धा लागली आहे. चीनवर टीका करून जास्त मते मिळतात, असा दोघांचाही ग्रह झाला आहे. चीनवरील टीकेमुळे उभय देशांत तणाव वाढला आहे.
दक्षिण चिनी समुद्र हा संघर्षाचा धोका असणारा भाग बनला आहे. कारण येथे चीनच्या दाव्यांमुळे तैवान आणि फिलिपाइन्ससोबतच अमेरिकेबरोबर तणाव वाढत आहे. अलीकडच्या काही महिन्यांत, चीन आणि फिलिपाइन्सच्या बोटी अनेक वेळा परस्परांच्या अगदी जवळ आल्या होत्या. वादग्रस्त सागरी क्षेत्रात दोन्ही देशांचे नौदल एकमेकांशी लपाछपीचा धोकादायक खेळ खेळत असल्याचे दिसते.
दोन्ही देशांमधील संघर्षाच्या सर्वात ताज्या घटनेत, चिनी तटरक्षक सैनिक फिलिपाइन्सच्या जहाजावर चढले आणि त्यांनी फिलिपिनो सैनिकांवर कुर्हाडी आणि चाकूने हल्ला केला. दक्षिण चीन समुद्रात चीन आणि फिलिपाइन्सच्या बोटी अनेक वेळा परस्परांच्या अगदी जवळ आल्या आहेत. अमेरिकेने या क्षेत्रात फिलिपाइन्सपासून जपानपर्यंतच्या देशांसोबत लष्करी युती केली आहे. दक्षिण चीन समुद्रातील आपल्या मित्र राष्ट्रांच्या हक्कांचे संरक्षण करणार असल्याचेही अमेरिकेने वारंवार सांगितले आहे. या कारणास्तव, रशियाचा युक्रेनवर हल्ला, स्वशासित तैवानवरील चीनचा दावा आणि व्यापार युद्ध यामुळे आधीच अनेक आव्हानांना तोंड देत असलेल्या चीनशी अमेरिकेचे संबंध अधिकच तणावपूर्ण बनले आहेत. अमेरिकेचे राजदूत निकोलस बर्न्स यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा शक्य असेल तेव्हा दोन्ही पक्षांना एकत्र आणून वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे.
चीन सरकारने दोन्ही देशांच्या सैन्यांमधील संवाद वाढविण्यास सहमती दर्शवली आहे आणि हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. संघर्ष टाळायचा असेल, तर साहजिकच सतत संवाद असायला हवा. कारण कोणत्याही प्रकारचा गैरसमज हा संघर्ष वाढवतो. चीन आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी झाला असला, तरी या वर्षी अमेरिकेत होणार्या अध्यक्षीय निवडणुकीमुळे पुन्हा एकदा संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. बर्न्स म्हणाले, की आम्ही चीनला आमच्या निवडणुकीत हस्तक्षेप करणे टाळण्याचा इशारा दिला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चीनच्या हस्तक्षेपाच्या शक्यतेबद्दल अमेरिका ‘अत्यंत चिंतित’ आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, ‘एफबीआय’ अधिकार्यांनी सांगितले होते, की अमेरिकेच्या निवडणुकांदरम्यान लोकांमध्ये संघर्ष वाढविण्याचे प्रयत्न चीन सुरू ठेवू शकतो आणि ऑनलाइन जगामध्ये चुकीची माहिती पसरवण्यास मदत करू शकते. ‘एफबीआय’कडे चिनी अधिकारी अमेरिकेवर ‘सायबर हल्ले’ करत आहेत, असा राजदूतांचा आरोप आहे.
चीनने नेहमीच सरकार प्रायोजित सायबर हल्ल्यांचे आरोप फेटाळले आहेत आणि त्यांनी स्वतःला अशा गुन्ह्यांचा बळी असल्याचे म्हटले आहे. बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प हे दोघेही चीनबाबत कठोरता दाखविण्यात परस्परांशी स्पर्धा करत आहेत. या रणनीतीने भरघोस मते मिळू शकतात, असे दोघांनाही वाटते. चीनमध्ये बनविलेल्या इलेक्ट्रिक कार, सोलर पॅनल आणि इतर वस्तूंवर व्यापार कराचा नवीन हप्ता लागू करण्याची घोषणा बायडेन यांनी मे महिन्यात केली होती. त्यामुळे आता चीनमध्ये बनविलेल्या फारच कमी इलेक्ट्रिक कार अमेरिकेत प्रवेश करीत आहेत. देशांतर्गत राजकीय दबावामुळे बायडेन प्रशासनाने चीनवर हे व्यापार कर लादले होते. निकोलस बर्न्स यांना हे मान्य नाही. ते म्हणाले, की हे एक आर्थिक पाऊल आहे, ज्याचा उद्देश अमेरिकन नागरिकांचा रोजगार वाचविणे हा आहे. दरम्यान, चीनने आपल्या बाजूने व्यापार कर लावणार असल्याचा इशारा दिला आहे.
अमेरिकेच्या राजदूतांच्या बहुतांश बैठका चीनच्या मंत्र्यांसोबत होतात. जिनपिंग यांना भेटण्याची संधी तेव्हाच मिळते, जेव्हा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांच्यासारखे नेते तेथे भेट देतात. दोन्ही देशांनी त्यांच्यातील नागरिकांची ‘हालचाल’ वाढविण्याची वचनबद्धताही व्यक्त केली आहे. चीनमध्ये शिक्षणासाठी येणार्या अमेरिकन विद्यार्थ्यांची संख्या 2011 मध्ये 15 हजारांवरून आता केवळ आठशेवर आली आहे. येत्या पाच वर्षांत किमान पन्नास हजार अमेरिकन विद्यार्थी शिक्षणासाठी चीनमध्ये शिकायला येतील, अशी आशा जिनपिंग यांनी व्यक्त केली. जिनपिंग यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेला भेट दिली होती, तेव्हा त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये म्हटले होते, की दोन्ही देशातील नागरिकांमध्ये संवाद आणि सहकार्य वाढविणे ही आमची सर्वात मोठी इच्छा आहे; परंतु त्यांच्या उक्ती आणि कृतीत अंतर आहे.
सॅन फ्रान्सिस्कोमधील शिखर परिषदेनंतर 61 वेगळ्या घटना घडल्या आहेत, जेव्हा चिनी सुरक्षा दलांनी किंवा अमेरिकन नागरिकांना अमेरिकन दूतावासातील राजनैतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यापासून रोखले. दोन्ही देशांतील लोकांना जवळ आणणे कठीण झाले आहे. चिनी विद्यार्थी आणि शैक्षणिक विद्वानांचा आरोप आहे, की अमेरिकन अधिकारी त्यांच्याशी पक्षपाती वागतात. वॉशिंग्टनमधील चीनच्या दूतावासाने या संदर्भात औपचारिक तक्रारही केली होती आणि अमेरिकन अधिकार्यांनी चिनी नागरिकांची ‘अनावश्यक’ चौकशी केल्याचा आरोप केला होता. ते विनाकारण त्रास देतात. त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे आणि अनेक वेळा अमेरिकेत शिकणार्या चिनी नागरिकांना वैध कागदपत्रे असूनही अमेरिकेत पोहोचताच त्यांना परत पाठविण्यात आले आहे.
चीन आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढण्याचे सर्वात मोथे कारण म्हणजे युक्रेनमधील युद्ध. अमेरिकेने चीनला भेट देणार्या आपल्या नागरिकांना ‘चीन दौर्याचा पुनर्विचार’ करण्याची विनंती केली आहे. चीनच्या तुरुंगात अनेक अमेरिकन नागरिक कैद आहेत. अमेरिकेच्या चीनमघील राजदूतांच्या मते त्यांना ताब्यात घेणे आणि कारवाई करणे चुकीचे आहे. चीनने अनेक अमेरिकन नागरिकांना देश सोडण्यास बंदी घातली आहे आणि त्यांचे पासपोर्ट विमानतळावर जप्त करण्यात आले आहेत आणि यामुळे ते चीन सोडू शकत नाहीत. त्याचवेळी चीनने अमेरिकेला अशा देशांच्या यादीतून वेगळे ठेवले आहे, ज्या देशांच्या नागरिकांना 15 दिवसांसाठी चीनला भेट देण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नाही. अलीकडच्या काळात चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध तणावाचे राहिले आहेत. सामान्य नागरिकांमधील संबंध सुधारणे सहज शक्य आहे; परंतु आज हे उद्दिष्ट साध्य करणे अवघड झाले आहे. दोन्ही देशांतील नागरिकांचा एकमेकांवरील अविश्वास वाढला आहे. रशियन-युक्रेन युद्धात चीन तटस्थ नाही.
चीन आपले खरे रंग दाखवत आहे. तो रशियाला मदत करीत आहे. चिनी कंपन्या रशियाला शस्त्रास्त्रं पुरवत असल्याचा अमेरिकेला संशय आहे. अमेरिकेने चिनी कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. चीनने रशियाला मदत सुरूच ठेवली, तर अमेरिका आणखी निर्बंध लादण्याची तयारी करीत आहे. गेल्या आठवड्यात इटलीमध्ये झालेल्या जी-7 बैठकीत चिनी कंपन्यांवर आणखी निर्बंध लादण्याची धमकी दिली होती. चीनने या इशार्यांना ‘पूर्वग्रह आणि खोटेपणाने भरलेली विधाने’ असे म्हटले होते. अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिल्यानंतर संतप्त झालेल्या चीनने अमेरिकेसोबतची सर्व चर्चा थांबविली होती.
यानंतर 2023 मध्ये चीन आणि अमेरिकेतील संबंध पुन्हा बिघडले, जेव्हा परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन चीनला भेट देणार होते. अमेरिकेने उत्तर अमेरिकेच्या आकाशात उडणार्या एका चिनी गुप्तहेर फुग्याला खाली पाडले, तेव्हा ब्लिंकेन यांनी भेट रद्द केली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बायडेन आणि जिनपिंग यांची सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भेट झाली, तेव्हा दोन्ही देशांमधील संबंध स्थिर झाले होते. सध्या दोन्ही देशांमध्ये खूप खडतर स्पर्धा सुरू आहे आणि ही परिस्थिती दीर्घकाळ कायम राहील असे दिसत आहे.