बर्लिन – जर्मनीच्या दक्षिणेकडील भागात अतिवृष्टीमुळे आपत्तीजनक पूर आल्याने ६०० हून अधिक लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले आणि सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे डोनाऊ, नेकर आणि गुएन्झसह अनेक नद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे.
त्यामुळे किनारपट्टीवरील लहान शहरे आणि काही मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अनेक भागात पाण्याची पातळी एका शतकातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे.
बव्हेरियामधील दहा जिल्ह्यांनी आणीबाणीची स्थिती घोषित केली आहे आणि न्युबर्ग-श्रोबेनहॉसेन जिल्ह्यातील ६७० हून अधिक रहिवाशांना स्थलांतरित केले जात आहे. बाडेन-वुर्टेमबर्गच्या मेकेनब्युरेन शहरात, पुराच्या धोक्यामुळे सुमारे १,३०० लोकांना त्यांची घरे सोडण्यास सांगण्यात आले.
दक्षिण जर्मनीमध्ये पूरामुळे रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली आहे. पूराच्या पाण्यामुले एक लांब पल्ल्याची रेल्वे रुळावरून घसरली. मात्र रेल्वेतील १८५ प्रवासी जखमी झाले नाहीत. या दुर्घटनानंतर रेल्वे प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर रेल्वेच्या फेऱ्या रद्द केल्या आणि प्रवाशांना पर्यायी मार्गांनी प्रवास करण्याच्या सूचना दिल्या.
बचाव कार्यादरम्यान एका फायर फायटरचा बुडून मृत्यू झाला आहे. दक्षिणेकडील बव्हेरिया प्रदेशातील इल्म नदीवर असलेल्या पॅफेनहोफेन शहरातील रहिवाशांना सुरक्षिततेसाठी आणण्याच्या प्रयत्नात असताना ही दुर्घटना घडली.