वाई (प्रतिनिधी) – वाई व परिसरात दुपारी विजाच्या कडकडाटात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी झालेल्या तुफान पावसाने ओढ्या नाल्यांना पूर आले. बावधन नाक्यावरील ओढ्याचे पाणी रस्त्यावर शिरल्याने काही काळ बावधनकडे जाणारी वाहतूक ठप्प होती.
पावसाने आज दुपारी तीनच्या सुमारास अचानक विजांच्या गडगडाटामध्ये सुरुवात केली. वाई व परिसरामध्ये सुमारे दोन तास मुसळधार पाऊस कोसळत होता. यामुळे गावातील ओढ्यांना ठिकठिकाणी पूर आले होते. तर शहरातील गटारे तुडुंब भरून वाहत होती.
या अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच त्रेधा उडाली. मुसळधार पावसाने शेते तुडुंब भरली होती. शेतात काम करणारे शेतकरी पावसामुळे शेतातच अडकले होते. बावधन नाका येथे ओढ्याला आलेल्या पुराचे पाणी ओढ्यात मावत नसल्याने रस्त्यावरून वाहत होते.
यामुळे बावधन यशवंतनगरकडे जाणारी वाहने अडकून पडली होती. पुरातून वाहून रस्त्यावर आलेल्या घोणस जातीच्या सापाला काही युवकांनी काठीने रस्ता पार करण्यात मदत केली. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. तर मुख्य रस्त्यावरच हा खेळ सुरु असल्याने वाहतूकही काही वेळ खोळंबली होती.