नगर, (प्रतिनिधी) – २० लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा सासरी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. नगर तालुक्यातील वाळकी येथे माहेरी राहणार्या पीडित विवाहितेने या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती संदीप महादेव पवार, सासू महादेवी महादेव पवार, सासरे महादेव सिध्दराम पवार, दीर श्रीनिवास महादेव पवार, जाव मंजुश्री श्रीनिवास पवार (सर्व रा. शिवम रेसीडेन्सी, स्पाईन रस्ता, चिखली, पिंपरी चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादीचा विवाह संदीप पवार याच्याशी झाला आहे. विवाहनंतर फिर्यादी सासरी चिखली, पिंपरी चिंचवड येथे नांदत असताना जानेवारी २०२२ते १६ जून २०२४ दरम्यान त्यांचा छळ करण्यात आला.
पती संदीपसह सासरच्यांनी त्यांच्याकडे वाहन खरेदी करण्यासाठी माहेरहून २० लाख रूपये घेऊन येण्याचा तगादा लावला. फिर्यादी यांनी पैसे आणले नाही म्हणून त्यांना उपाशीपोटी ठेऊन शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, पीडित फिर्यादीने भरोसा सेलकडे तक्रार केली होती. तेथे समझोता न झाल्याने भरोसा सेलने गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र दिले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे