Russian Army । पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील गोराया येथील आणखी एका भारतीयाने ट्रॅव्हल एजंटकडून फसवणूक केल्याचा आरोप आहे. पीडित मनदीप कुमारच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ट्रॅव्हल एजंटने त्याला इटलीला पाठवण्याचे आश्वासन देऊन फसवले. मनदीपला इटलीऐवजी मॉस्कोला पाठवण्यात आले आणि तेथे त्याला सैन्यात भरती होण्यास भाग पाडले.
मनदीप कुमारचा भाऊ जगदीप कुमार म्हणाला,’माझ्या भावाला लहानपणापासूनच पायात समस्या आहे. मनदीप आणि त्याच्या मित्रांना अर्मेनियामार्गे इटलीला जाण्यासाठी दिशाभूल करण्यात आली, पण ते रशियाला पोहोचले. एजंटने त्यांचे शोषण केले. त्यांना धमकावून आणखी पैशांची मागणी केली.’
कुटुंबाने पुढे सांगितले की, ‘मार्चमध्ये मनदीपशी शेवटचा संपर्क झाला होता, ज्यामध्ये तो लष्कराच्या गणवेशात होता आणि बचावासाठी विनंती करत होता. यामध्ये मनदीप रशियन आर्मीकडून आपल्या जीवाला असलेल्या धोक्याबद्दल सांगत होता. जगदीप कुमार म्हणाले, “जेव्हा आम्ही ऐकले की युद्धग्रस्त युक्रेनमध्ये तैनातीसाठी मनदीप आणि इतर पंजाबी मुलांना जबरदस्तीने रशियन सैन्यात भरती करण्यात आले, तेव्हा आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.’
आता हे कुटुंब मनदीपला देशात परत आणण्यासाठी सरकारकडे मदत मागत आहे. कुटुंबाने राज्यसभा खासदार बलबीर सिंह सीचेवाल यांच्याशी संपर्क साधला आहे. सीचेवाल म्हणाले की,’त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे हा मुद्दा ताबडतोब मांडला आहे आणि अशात अडकलेल्या मनदीप कुमार आणि इतरांचे सुरक्षित परत येण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. सीचेवाल म्हणाले, “बेईमान एजंटांकडून निरपराध तरुणांची कधी दिशाभूल केली जाते हे जाणून घेणे खूप त्रासदायक आहे. आपण आपल्या तरुणांना अशा जाळ्यात अडकण्यापासून सावध केले पाहिजे.’