पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात अमली पदार्थांचा सुळसुळाट झाला आहे. कधीकाळी विद्येचे माहेरघर असणारे पुणे आता ड्रग्जचे आगर म्हणून देशात ओळखले जात आहे. अशा स्थितीत सत्ताधारी पक्षाचे नेते विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपात व्यस्त आहेत. हे थांबणार कधी? याचे उत्तर द्या अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी पुण्यात आंदोलन करण्यात आले.
या वेळी “पालकमंत्री उत्तर द्या’ असा मजकूर लिहिलेले फलक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झळकले. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर टीका करणारे फलकही यावेळी झळकवण्यात आले. शहरात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढतच असून, भर दिवसा हातात कोयता घेऊन हिंडणारे गुंड अनेक ठिकाणी दिसत आहेत.
कायद्याचा धाक गुन्हेगारांना राहिलेला नाही. अशा परिस्थितीत सत्ताधारी मात्र केवळ लोकसभा निवडणुकीच्या चिंतनात, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आणि विधानसभेच्या जागा वाटपात व्यस्त असल्याचा आरोप यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. फर्गसन काॅलेज रस्त्यावरील पादुका चौक येथे हे आंदोलन करण्यात आले.