हडपसर – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवारी (दि. २) हडपसर येथून मार्गस्थ होत आहे. येथून दोन्ही पालखी सोहळे शहरातून ग्रामीण हद्दीत प्रवेश करणार असल्याने निरोपासाठी भाविकांची येथे मोठी गर्दी होते. यापार्श्वभूमीवर महापालिका व पोलीस प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे.
पुणे-सोलापूर या संत तुकाराम महाराज व पुणे-सासवड या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावास्थळी रंगरंगोटी करण्यात आली आहे. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे म्हणून काही वर्षांपासून विसावास्थळाऐवजी गाडीतळ बसथांब्याच्या प्रांगणात तशी सुविधा करण्यात आली आहे. या वर्षीपासून संत तुकाराम महाराज पालखी नेहमीच्या विसावा ओट्याऐवजी त्यालगत थेट मार्गावर व्यवस्था करण्यात येणार आहे.
प्रशासनाकडून येणाऱ्या भाविकांसह वारकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सेवा, सुविधा व सुरक्षा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
पोलीस प्रशासनाने या वर्षी तीन पोलीस उपायुक्त, पाच सहाय्यक पोलीस आयुक्त, सात पोलीस निरीक्षक यांच्यासह सुमारे ४०० पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पालिकेकडून येथील विसावा स्थळांची डागडुजी, रंगरंगोटी तसेसच वारकऱ्यांसाठी स्वच्छतागृहे, आरोग्यसुविधा आदी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत.
“हडपसर परिसरात एकाच दिवशी दोन्हीही संतांचा पालखी सोहळा येतो. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांसह राज्याच्या विविध भागातील नागरिक येथे दर्शनासाठी गर्दी करतात. त्यामुळे या भागात सुरक्षेची मोठी जबाबदारी आहे. यासाठी पोलिस मित्र, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थी व स्वयंसेवकांसह यांच्यासह काही पोलिसबळ वाढवून मागितले आहे.” – संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे
“महापालिकेकडूनपालखी मार्गांची स्वच्छता करण्यात आहे. विसावा स्थळांची रंगरंगोटी, मंडप व्यवस्था व दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे. पाण्याचे टँकर, फिरते स्वच्छतागृह व आरोग्य सुविधेची व्यवस्था केलेली आहे. रस्त्यावरील खड्डे, साईडपट्ट्या भरून घेतलेल्या आहेत. विद्युत पुरवठा तपासणी केली जात आहे. सुमारे ९०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहेत.” – बाळासाहेब ढवळे पाटील, सहाय्यक आयुक्त, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय