UEFA Euro Cup 2024 (Switzerland vs Germany) :- युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील अ-गटात अखेरच्या साखळी सामन्यात अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत चुरस पाहायला मिळाली. जर्मनी विरुद्ध स्वित्झर्लंड या सामन्याचा निकाल 90 मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेतच लागला. राखीव खेळाडू निक्लस फुलक्रुगने 92 व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे जर्मनीने स्वित्झर्लंडला 1-1 असे बरोबरीत रोखले.
जर्मनीने यापूर्वीच बाद फेरीतील स्थान निश्चित केले होते. मात्र, साखळी फेरीत अपराजित राहण्याचे त्यांचे ध्येय होते. त्यांचे हे ध्येय फुलक्रुगने अगदी मोक्याच्या वेळी अचूक हेडर मारून केलेल्या गोलमुळे साध्य झाले. याबरोबरीने जर्मनीने गटात अग्रस्थान मिळवले. स्वित्झर्लंडचा आक्रमकपटू डॅन एन्डोयेने पूर्वार्धात 28 मिनिटाला स्वित्झर्लंडला अनपेक्षित आघाडी मिळवून दिली. यानंतर सामन्यात जर्मनीचे वर्चस्व राहिले.
निर्विवादपणे त्यांनी आपल्या खेळाचा प्रभाव पाडला होता. गोलकक्षात सातत्याने धडक मारणाऱ्या जर्मनीला रोखण्यासाठी अनेकदा स्वित्झर्लंडच्या खेळाडूंनी धोकादायक प्रयत्न केले. प्रत्येक वेळेस जर्मनीने पेनल्टीसाठी अपील केले, पण इटालियन पंच डॅनिएल ओर्साटो यांनी अपील फेटाळून लावली. जर्मनीचा एक गोलही अपात्र ठरविण्यात आला.
UEFA Euro Cup 2024 : बेल्जियम पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर, रोमेनियाला केलं पराभूत…
सामन्यात गोलजाळीच्या दिशेने तब्बल 18 फटके मारल्यानंतरही जर्मनीच्या पदरी फुलक्रुगच्या अचूक हेडरपर्यंत निराशाच पडली होती. डाव्या बाजूने आलेल्या क्रॉसवर स्वित्झर्लंडच्या दोन बचावपटूंनी घेरल्यानंतरही फुलक्रुगने सारी क्षमता पणाला लावून हेडरने चेंडूला गोलजाळीची दिशा दिली. त्यामुळे जर्मनीला बरोबरी साधता आली.