Frank Duckworth Death : क्रिकेटला डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) नियम देणारे इंग्लिश सांख्यिकीशास्त्रज्ञ फ्रँक डकवर्थ यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. ‘ईएसपीएनक्रिकइंफो.कॉम’ च्या रिपोर्टनुसार, डकवर्थ यांचा मृत्यू 21 जून रोजी झाला. डकवर्थ यांनी त्यांचे सहकारी सांख्यिकीशास्त्रज्ञ टोनी लुईस यांच्यासमवेत डिएलएस (DLS) पद्धत विकसित केली. हा नियम पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यांसाठी वापरला जातो.
Frank Duckworth and Tony Lewis the inventors of the Duckworth-Lewis method on March 25, 2003 at the County Ground in Northampton, England. (2003) pic.twitter.com/xnWjU8KTmY
— Great British Getty Images (@shitbritishpics) June 25, 2024
साल 1997 मध्ये प्रथमच क्रिकेट सामन्यात DLS पद्धत लागू करण्यात आली. चार वर्षांनंतर, म्हणजे 2001 मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (ICC) याला हिरवा सिग्नल दिला. फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस यांच्या निवृत्तीनंतर स्टीव्हन स्टर्न या ऑस्ट्रेलियन सांख्यिकीतज्ज्ञाने या पद्धतीत काही सुधारणा केल्या. या कारणास्तव या नियमाला डकवर्थ-लुईस-स्टर्न (Duckworth-Lewis-Stern) असे नाव देण्यात आले. डकवर्थ आणि लुईस यांना जून 2010 मध्ये मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (MBE) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डकवर्थ-लुईस पद्धत तेव्हा अंमलात आणली जाते जेव्हा पाऊस किंवा इतर कारणांमुळे सामना सुरू ठेवण्यास अडथळा निर्माण होतो. वेळ वाचवण्यासाठी ओव्हर्स देखील कमी केले जातात. म्हणून डिएलएस (DLS) नियम लागू करताना अनेक पैलू विचारात घेतले जातात. जसे एखाद्या संघासाठी किती विकेट्स शिल्लक आहेत, किती षटके झाली आहेत आणि याशिवाय इतर अनेक पैलू देखील विचारात घेतले जातात.
डिएलएस (DLS) मेथड काय आहे?
डिएलएस (DLS) मेथडचे पूर्ण नाव डकवर्थ-लुईस स्टर्न मेथड आहे, जेव्हा पाऊस किंवा इतर कारणांमुळे मर्यादित षटकांच्या सामन्यात धावांचे लक्ष्य पूर्ण करणे शक्य होत नाही तेव्हा ती वापरली जाते. या स्थितीत टार्गेट सुधारित केले जाते.
बीसीसीआयने आधी नाकारले, नंतर स्विकारले…
ही पद्धत भारतात 2006 मध्ये पहिल्यांदा वापरली गेली. सुरुवातीला बीसीसीआयने या पद्धतीला विरोध केला होता, नंतर ती स्वीकारली. भारतात हा नियम 2006 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात वापरण्यात आला होता.
फ्रँक 2014 मध्ये झाले होते निवृत्त…
फ्रँक डकवर्थ यांनी 1961 मध्ये लिव्हरपूल विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पुढील शिक्षण घेतले. फ्रँकने 1965 मध्ये धातुशास्त्रात पीएचडी पदवीही प्राप्त केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेसाठी सल्लागार सांख्यिकीशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले आणि फ्रँक 2014 मध्ये निवृत्त झाले.